बीड (रिपोर्टर): बीड शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला. अनेक वार्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. स्वच्छता विभागाचे कर्मचारी वेळेवर कचरा उचलत नसल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकाट जनावरांसह कुत्र्यांची संख्याही शहरात वाढल्याने त्यामुळे नागरीकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागते. नगरपालिका प्रशासनाला नागरीकांच्या समस्यांचे काही देणेघेणे आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. नागरी समस्यांसंदर्भात 22 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने लक्षवेधी ‘भैस के आगे बिन बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे.

शहरातील पांगर रोड, जालना रोड, बार्शी रोड यासह आदी भागांमध्ये मोकाट जनावरांसह कुत्र्यांची संख्या वाढली. या जनावरांचा त्रास शहरवासियांना होऊ लागला आहे. आतापर्यंत अनेक नागरीकांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. कुत्रे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिका करू शकली नाही तसेच शहरातील नागरी समस्या सुधारण्याचे काम न.प.ला करता येत नाही. कचर्याचे जागोजागी ढीग पडलेले आहेत. न.प.मध्ये स्वच्छता विभाग फक्त नावालाच आहे की काय? अस्वच्छतेमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळीमुळे नागरीक घराच्या बाहेर पडण्यास टाळाटाळ करू लागले. एकूणच शहरातील समस्यांबाबत 22 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे.











