जरांगेंच्या उपस्थितीत मोर्चा सुरू; 11 वाजता सराटी अंतरवली सोडली
महिलांची संख्या लक्षणीय, आजचा मुक्काम मातोरीत
सराटी अंतरवली (भागवत जाधव) मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमारपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुंबईकडे कुच केली आहे. लाखो मराठ्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण मोहीम फत्ते करण्या हेतू आज सकाळी 9 वाजता मुंबई मोहिमेला सुरुवात झाली. धुळे-सोलापूर महामार्ग गेवराईपासून पुढे मोर्चेकर्यांमुळे बंद ठेवण्यात आला आहे. लाखोंच्या संख्येने मराठे या मोर्चात सहभागी झाले आहेत. दुपारी हा मोर्चा गेवराई येथे डेरेदाखल होईल. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत होणार असून 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत.

आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेत मुंबई मोहीमेवर कूच केली. लाखो मराठ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम फत्ते करण्यासाठी जरांगे निघाले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. आतापर्यंत सरकारला दोन वेळेस वेळ दिला. सात महिने वेळ देऊनही सरकार मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे.

त्यामुळे सकाळी नऊ वाजता सराटी अंतरवलीतून सुरू झालेला मोर्चा हा दुपारी बारा वाजता धुळे-सोलापूर महामार्गावर आला. आता सध्या तो वडीगोद्री जवळ असून दुपारच्या दरम्यान तो गेवराईत डेरेदाखल होईल. या मोर्चामध्ये मराठा समाजातील महिला-भगिनीही मोठ्या संख्येने पहावयास मिळाल्या. आजचा मुक्कम हा मनोज जरांगे यांच्या मातोरी या गावी असणार आहे. पुढे 21 तारखेला मराठा आंदोलक दुपारी पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी येथे भोजन करणार आहे तर रात्रीचा मुक्काम हा करंजी घाटातील बारा बाभळी येथे असणार आहे.

इकडे मोर्चाला सुरुवात झाली आणि तिकडे मुंबईत सरकारने हालचाली सुरू केल्या असून दुपारी तीन वाजता मराठा आरक्षणावर मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येते. ही शेवटची लढाई समजून मराठेही आक्रमकपणे या मोर्चात सहभागी होताना दिसून येत आहेत.











