बीड (रिपोर्टर): महसूल, जिल्हा परिषद आणि सहकार या महत्वाच्या विभागात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अधिकार्यांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाचा आहे. सोबतच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून जे वर्ग 1 आणि 2 चे अधिकारी आहेत त्यांच्याही संबंधित खातेप्रमुखांनी बदल्या केल्या पाहिजे, असे असताना बीड जिल्ह्याचे रहिवासी असलेले अशोक कदम यांची सहकार विभागाने विशेष बाब म्हणून बीड येथे सहाय्यक निबंधक म्हणून बदली केली आहे. ते गेल्या चार वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकीय संचालक मंडळात कार्यरत आहेत. बीड येथे नियुक्तीसाठी त्याचाच फायदा झाल्याचे बोलले जात आहे.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या महत्वपुर्ण पदावर अशोक कदम हे काम करतात. त्यांनी बीड येथे बदली झाल्यानंतर तत्कालीन राज्य मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर ते सहाय्यक निबंधक लातूर येथे बदली झाले होते. लातूर येथून ते सध्या औसा येथे सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी सहकार सचिवाने विशेष बाब म्हणून बीड येथे परदेशी यांच्या सेवानिवृत्तीनंतर अशोक कदम यांची सहाय्यक नबंधक म्हणून पदस्थापना केली आहे. गेल्या चार वर्षांपासून ते बीड जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय मंडळात संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यरत असताना त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डबघाईला येण्यास कारणीभूत ठरलेल्या अनेक पदाधिकार्यांना मदत केलेली आहे. म्हणूनच त्यांची विशेष बाब म्हणून बीड येथे बदली करण्यात आल्याची चर्चा सहकार क्षेत्रात केली जात आहे.