मुंबई (रिपोर्टर): देशातील 15 राज्यांतून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जाहीर होताच महाराष्ट्रात अनेक नावांची चर्चा झाली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव यात आघाडीवर आहे. भाजपकडून यावेळी त्यांना उमेदवारी निश्चित मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत असताना बिहारची जबाबदारी चोख बजावणारे विनोद तावडे यांनाही राज्यसभेचं बक्षिस दिलं जाण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सभेतील 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 15 राज्यातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील 6 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये केेंद्रियमंत्री नारायण राणे, प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधर आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण याचां समावेश आहे. प्रकाश जावडेकर व वंदना चव्हाण यांना त्यावेळी पुण्यातून संधी मिळाली होती. आता कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे तर दुसरीकडे पंकजा मुंडे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. मराठवाड्यात त्यांना बर्यापैकी जनाधार आहे. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात त्या मंत्री होत्या. मात्र, 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पक्षांतर्गत कुरघोडीतून हा पराभव झाल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर देशपातळीवरील संघटनेत त्यांना पद मिळालं. त्यांना विधान परिषदेत किंवा राज्यसभेत सामावून घेतलं जाईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती.
महाराष्ट्रातून सहा जागा राज्यसभेवर निवडून द्यायच्या आहेत. भाजप हा सध्या राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या आमदारांचं पाठबळही भाजपला आहे. त्यामुळं सहापैकी सर्वाधिक उमेदवार भाजपचेच निवडून जातील, असं चित्र आहे. भाजपकडून शिंदे आणि अजित पवार गटाला संधी दिली जाते का हेही पाहावं लागणार आहे.











