परळी-सोनपेठ रोडवर घडली आज सकाळी घटना
परळी (रिपोर्टर): बोअरवेल घेऊन शहराकडे निघालेल्या बोअरवेलच्या गाडीला विजेची तार चिकटल्याने गाडीमध्ये विद्युतप्रवाह उतरून दोन मजूर जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. ही दुर्दैवी घटना आज सकाळी वाघबेट येथील परळी-सोनपेठ रोडवर घडली.
परळी तालुक्यातील वाघबेट येथे बोअर घेण्यासाठी ओडीसा राज्यातील बोअरवेलची गाडी आणण्यात आली होती. बोअर घेऊन गाडी शहराकडे निघाली असता परळी-सोनपेठ रोडवर विजेची तार गाडीच्या मशिनला स्पर्श झाल्याने गाडीमध्ये विद्युत प्रवाह उतरला. त्यात गोविंदा धवनसिंग व संदीप डाक्टर या दोन मजुरांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य दोन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले. दरम्यान चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.












