बीड (रिपोर्टर): विद्यार्थी दशेसाठी महत्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. जिल्ह्यात 102 परीक्षा केंद्रांवर 41 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेमध्ये कॉप्या चालू नाही म्हणून केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. परीक्षेचा आज पहिला दिवस असल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुडे यांनी परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयाला भेट देऊन तेथील परीक्षेची पाहणी केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आजपासून बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत जिल्ह्यात 102 केंद्रांवर 41 हजार 52 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र आहेत. आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. परीक्षेच्या दरम्यान कॉप्या चालू नाही म्हणून शिक्षण विभागाकडून भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच परीक्षा केंद्राभोवती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी वैद्यनाथ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला भेट देऊन तेथील परीक्षेची पाहणी केली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य राठोड, केंद्र संचालक देशमुख, ढाकणे, कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.












