बीड, (रिपोर्टर)ः- जिल्ह्यासह मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. मार्च महिना उजडला नाही तोच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. पाऊस कमी पडल्यामुळे विहिरींनी तळ गाढला अनेकांचे बोअर आटले. त्यामुळे पाण्यासाठी लोकांना वन-वन भटकंती करावी लागू लागली. केज, धारूर आणि लातुर या तीन ठिकाणी पाणी पुरवठा करणार्या मांजरा धरणातही यंदा फक्त 12 टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिला. बीड न.प.ला पाणी पुरवठा होत असलेल्या माजलगावच्या धरणात तर 2 टक्के पाणी शिल्लक राहिले. जिल्ह्यातील एकुण धरणात फक्त 13 टक्के पाण्याचा साठा असल्याने आगामी काळात पाण्याचा प्रश्नअतिगंभीर होणार असल्याचे दिसुन येत आहे.

मराठवाड्यामध्ये दुष्काळ असल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होवू लागली. फेब्रुवारी महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी टँकरची मागणी झाली आहे. काही ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले. ज्या विहिरींना आणि बोअरला चांगले पाणी आहे त्या विहिरी अधिग्रहीत करण्याचा विचार शासन करत आहे. बीड जिल्ह्यात एकुण 143 लहान मोठे धरणे आहेत. त्यात 16 मध्यम व 126 लघु प्रकल्प आहेत. 4 प्रकल्पात 75 टक्केयापेक्षा जास्त पाण्याचा साठा आहे. मांजरा धरणावर धारूर, केज आणि लातुर हे शहर अवलंबून आहेत. या धरणातून या तिन्ही नगर पालिकेसह 12 गावच्या ग्रां.पं ना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र या धरणात फक्त 12 टक्केपाण्याचा साठा शिल्लक राहिलेला आहे. माजलगाव धरणातून बीड न.प.ला पाणी पुरवठा होत आहे. या धरणात फक्त 2 टक्के पाणी साठा शिल्लक राहिला. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावू लागली. पाणी पुरवठ्या बाबत शासनाला गांभीर्याने घ्यावे लागणार आहे. तीन वर्षापुर्वी अशाच दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ मराठवाड्यावर आली होती. मार्च महिन्यापासुन उन्हाची तिव्रता वाढणार असल्याने ठिक ठिकाणी पाणी पुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.












