बीड (रिपोर्टर): सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी काल बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनकर्त्यांविरोधात बीड जिल्ह्यातल्या सर्वच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 519 पेक्षा अधिक जणांवर गैरकायद्याची मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश डावलणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे व सार्वजनिक रस्त्याने ये-जा करणार्या वाहनांसह लोकांना अडवणे प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरच्या गुन्ह्याचे फिर्यादी दस्तुरखुद्द गृहविभागाचे पोलीस झाले आहेत. सदरचे गुन्हे दाखल झाले असले तरी अद्यापपर्यंत कोणीही अटक नसल्याचे सांगण्यात येते.
बीड जिल्ह्यातील आष्टी, अंभोरा, बीड ग्रामीण, पिंपळनेर, चकलांबा, शिरूर कासार, पाटोदा, धारूर, दिंद्रुड, युसुफवडगाव, सिरसाळा या पोलीस ठाण्यात 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अहमदनगर रोडवर रास्ता रोको केला म्हणून चिंचपूर येथील 13 जणांवर धानोर्यातल्या संतोषीमाता चौकात रास्ता रोको केल्याने प्रत्यक्ष आठ जणांसह अन्य 20 ते 25 जणांवर, धामनगाव येथील दहा जरांवर, सोलापूर-धुळे हायवेवर रस्ता रोको केल्या प्रकरणी 50 ते 60 जणांवर, पुन्हा पाली परिसरातच रास्ता रोको करणार्या प्रत्यक्ष दोघा जणांसह 15 ते 20 जणांवर, इकडे जरुड फाटा रोखून धरणार्या प्रत्यक्ष तीन जणांसह 35 ते 40 जणांवर, घोडका राजुरी येथील प्रत्यक्ष तिघांसह 30 ते 40 जणांवर, मालेगाव बु. येथील 13 जणांवर पौळाचीवाडी येथील 17 जणांवर, पांढरवाडी फाटा येथील 26 जणांवर, जाटनांदूर फाटा येथे 55 जणांवर, पाटोद्याच्या गारमथ्यावर आंदोलन करणार्या 35 ते 40 जणांवर, वैद्यकीन्ही चौकात आंदोलन करणार्या 43 जणांवर, चोरांबा येथे आंदोलन करणार्या 25 जणांवर, कोळगाव पाटी येथील तिघा जणांवर, धारूर येथील छत्रपती चौकात आंदोलन करणार्या चौदा आंदोलकांवर तेलगाव येथील 34 जणांवर भारतीय दंड विधानासह महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण 519 पेक्षा अधिक आंदोलकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये प्रथमच रस्ता रोको दरम्यान सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.












