मराठवाड्यात कॉपी करणार्या 140 विद्यार्थ्यांवर कारवाई
बीड (रिपोर्टर): दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षेदरम्यान कॉप्यांवर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून योग्य त्या उपाययोजना आखण्यात आल्या. कॉपी करणार्यांविरोधात कारवाई केली जात आहे. मराठवाड्यात संभाजीनगर विभागात आतापर्यंत 140 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत बीडचा एकही विद्यार्थी नाही. बीडमध्ये एकही विद्यार्थ्याने कॉपी केली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेत शनिवारपर्यंत कॉपी प्रकरणी 140 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. यामध्ये पाच जिल्ह्यात 140 विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली. जालना जिल्ह्यात 19, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 7, हिंगोली जिल्ह्यात 1 कॉपीचा प्रकार आढळला असून सर्वाधिक कॉपीची कारवाई 113 विद्यार्थ्यांवर परभणी जिल्ह्यात करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे बीड जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्यावर कारवाई झाली नाही. याचा अर्थ बीडमध्ये कॉपी झालीच नाही का?