बजरंग सोनवणेंचा आज पक्षप्रवेश ?
बीड/केज (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आपल्या समर्थकांना पक्षांतराचा बेलंभडारा उधळण्यासाठी थेट जेजुरीत बोलावून घेतल्याने बीड जिल्ह्यातले सोनवणे समर्थक शेकडो गाड्या घेऊन जेजुरी गडावर डेरेदाखल होत असून दुपारी चारनंतर तेथून हे सर्वजण पुणे येथे जाणार आहेत. त्याठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे आज सायंकाळपर्यंत शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील, असे सुत्रांचे सांगणे आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात दे धक्काचे राजकारण सुरू झाल्याने दिवसागणिक राजकीय समीकरणे बदलत आहेत. भाजपाने माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषीत केल्यानंतर आणि या वेळेस कृषीमंत्री धनंजय मुंडे हे पंकजांच्या सोबत असल्याने पंकजांचा लाखोंच्या मतातला विजय कोणीही रोखू शकणार नाही अशी स्पष्ट चर्चा होत असतानाच शरद पवार गटाने बीडमधील अजित पवारांच्या गटाला जबरदस्त हादरा देत अजित पवार यांच्या गटाचा नेमका मोहरा टिपला. बजरंग सोनवणे यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत खा. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढविली होती. ते त्या वेळेस लाखभर मतांनी पराभूत झाले होते. आता पुन्हा तोच चेहरा शरद पवार निवडणूक रिंगणात पंकजांविरोधात उतरवू शकतात. तत्पुर्वी बजरंग सोनवणे हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार त्यासाठी आज पक्षांतराचा बेलभंडारा उधळण्यासाठी सोनवणे समर्थक जेजुरीच्या गडावर एकत्रित होत आहेत. दीडशेपेक्षा अधिक गाड्या सध्या गडाच्या दिशेने कूच करत असून दुपारी चारनंतर हे सर्व पुणे मार्गस्थ होणार आहेत आणि त्याठिकाणी बजरंग सोनवणे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश अपेक्षीत आहे.