परळीत आज बैठक होणार; जरांगे पाटील काय बोलणार, राज्याचे लक्ष
परळी (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या परळी येथील नियोजीत संवाद बैठकीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर त्या विरोधात मराठा आंदोलक हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले, त्याठिकाणी खंडपीठाने जरांगे पाटील यांच्या महासंवाद बैठकीला दोन शर्तींवर परवानगी दिली. यामध्ये नेत्यांना गावबंदी करू नका आणि दोन जाती धर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्ये करू नका. अशा सूचना मराठा आंदोलकांना देण्यात आल्याने आज दुपारनंतर जरांगेंच्या उपस्थितीत मराठा समाजाची संवाद बैठक होणार आहे. तत्पुर्वी जरांगे हे बीड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. परळीतील बैठकीत मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून गावागावात जावून समाज बांधवांसोबत संवाद साधत आहेत. त्यानुसार परळीतील मोंढा मैदान भागात आज 20 मार्च रोजी समाज बांधवांनी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्याविरोधात मराठा आंदोलक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्याय मागण्यासाठी गेले होते. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्ये करू नका, नेत्यांना गावबंदी करू नका, या अटीवर मराठा समाजाच्या संवाद बैठकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर परळीतील मोंढा मैदान भागात मराठा समाजाची संवाद बैठक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीमध्ये जरांगे पाटील काय बोलणार याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. तत्पुर्वी जरागें हे आज दुपारी बीड येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेत जरांगे काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून असून ही पत्रकार परिषद झाल्यानंतर ते परळीच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत.












