वाळु घेवून जाणारे दोन ट्रॅक्टर पकडले
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातल्या नद्यामधून अनाधिकृतपणे वाळु उपसा सुरू आहे. वाळुतून माफिया मोठी कमाई करतात. वाळु माफियांना काही महसुल आणि पोलीस अधिकार्यांचे आशिर्वाद असल्यामुळेच वाळुचा लपून छपून धंदा सुरू आहे. चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी वाळूवर कारवाई करण्यात आली. अशा थातुर-मातुर कारवाया नेहमी होतात. मात्र बड्या माफियांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गईबीनगर तांडा येथे वाळुवर पोलीसांनी कारवाई केली. परवाना नसतांना ट्रॅक्टरमध्ये वाळु घेवून जात असतांना पकडण्यात आले. या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळु होती या प्रकरणी रमेश चेडे (रा.उमापुर ता.गेवराई) याच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ठाण्याचे पवळ यांनी फिर्याद दाखल केली. दुसरी घटना याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. उमापुर गावातील राक्षसभुवन कमानीजवळ वाळु घेवून जाणारा ट्रॅक्टर पकडण्या आला यात एक ब्रास वाळु होती. ट्रॅक्टरसह वाळु जप्त करण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासुन सिंदफणा, गोदावरी यासह इतर नदीपात्रातून अनाधिकृतपणे वाळूचा उपसा सुरू आहे. वाळु माफिया विरोधात कुठलीही ठोस कारवाई होत नाही. काही ठिकाणी तर जेसीबीद्वारे वाळु उपसून ती इतर ठिकाणी साठा करून ठेवली जाते व त्या ठिकाणाहून वाळुची विक्री होते. वाळु माफियांना भ्रष्ट अधिकार्यांचे अभय असल्याचे दिसुन येत आहे. पोलीस प्रशासन 1-2 ब्रास वाळु घेवून जाणार्या वाहनांवर कारवाई करतात मात्र बडे मासे सोडून देत आहेत.