आज या उद्या उमेदवारी घोषणेची शक्यता
मुंबई (रिपोर्टर): भारतीय जनता पार्टीने बीड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषीत करून आज अठरा ते वीस दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप शरद पवारांकडून आपल्या उमेदवाराची घोषणा झाली नाही. पंकजा यांनी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाभरात प्रचार सुरू केला. दुसरीकडे पवारांचा उमेदवार कोण? ज्योतीताई मेटे की बजरंग सोनवणे ? यावरच चर्चा होत असताना ज्योतीताई मेटे यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी म्हटले. त्यात आज शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना भेटीसाठी बोलवल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. त्यानुसार सोनवणेही मुंबईत डेरेदाखल झाले असून दुपारनंतर सोनवणे पवार यांची भेट घेणार आहेत. सदरची भेट ही उमेदवारी घोषणेबाबत असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या चार ते पाच दिवसांच्या कालखंडात पंकजा मुंडे यांनी बीड, गेवराई, केज, आणि आज अंबाजागेाई तालुक्यातील प्रतिष्ठीतांसह मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. एकीकडे उमेदवारी घोषीत झाल्याने भाजपाचा उमेदवार प्रचारात सुसाट असताना बजरंग सोनवणे यांनीही भेटीगाठीवर भर दिला मात्र दोन दिवसांपूर्वी शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यांनी आपण निवडणूक लढवणारच असे वक्तव्ये करून उमेदवारी निश्चितेबाबत काहीसे संकेत दिले. मात्र शरद पवार गटाचा उमेदवार कोण? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून असल्याने जो तो पवारांच्या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहे. आज अचानक शरद पवारांनी भेटीसाठी बजरंग सोनवणे यांना तात्काळ बोलवले. त्यानुसार बजरंग सोनवणे मुंबईत डेरेदाखल झाले असून दुपारनंतर सोनवणे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत चर्चा काय होते? आणि बीडचा उमेदवार कोण असेल? हा प्रश्न आज निकाली लागू शकतो आणि त्यानुसार शरद पवार बीड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषीत करतील असा कयास मांडला जात आहे.