बीड (रिपोर्टर): सातत्याने दुष्काळाला सामोरे जात असलेल्या बीड जिल्ह्यात वृक्षारोपणावर प्रशासन प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना केवळ झाड तोडले तर आपल्या विरुद्ध बोंबाबोंब होईल म्हणून तहसील आवारातले मोठमोठे झाड बुडाला आग लावून तोडले जात असल्याचा प्रकार बीडच्या तहसील परिसरामध्ये उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे झाडे ना बांधकामाला आडवे येतात ना अन्य कुठल्या कामाला आडवे येतात तरीही ते झाड तोडण्याचे काम संबंधितांकडून केले जात आहे.
बीड तहसील आवारामध्ये गेल्या कित्येक वर्षाचे मोठमोठे झाडे आहेत. सध्या तहसील परिसरामध्ये इमारतीचे बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या झाडांना बुडाखाली आग लावण्यात आली आहे ते झाडे बांधकामास कुठेही आडवे येत नाहीत. मात्र ते झाडे तोडले जावेत, या आभिलाषेने झाडाच्या बुडाला जाळ करून ते जाळण्यात आले. अज्ञातांनी आग लावल्याची बोंब उठवून संबंधितांनी जाणीवपुर्वक ते झाड जाळले. एकीकडे वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करायचा आणि दुसरीकडे मोठमोठे झाडे तोडून टाकायचे ही दुटप्पी भूमिका बीड प्रशासनाची सातत्याने दिसून आली आहे, आणि आज पुन्हा ती समोर आली. या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील झाड तोडले गेले म्हणून बीड प्रशासनावर टीका झाली. ती टीका होऊ नये म्हणून झाड तोडण्यापेक्षा जाळण्याचा उद्योग तहसील प्रशासनाने केला.