बीड (रिपोर्टर)- 14 व्या वित्त आयोगासह शासनाकडून आलेल्या विविध योजनांच्या निधीमध्ये अपहार केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पिंपळनेरचे सरपंच भारत जवळकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या कार्यकाळात झालेला अपहार यास तत्कालीन ग्रामसेवकही तेवढेच जबाबदार असल्याने चार ग्रामसेवकांसह सरपंचावर फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालखंडात पिंपळनेर ग्रामपंचायतीसाठी 14 व्या वित्त आयोगासह अन्य योजनांसाठी 1 कोटी 48 लाख 5 हजार 22 रुपये आले होते. त्यापैकी सुमारे 52 लाख रुपयांचा सरपंच भारत जवळकर यांनी अपहार केल्याची तक्रार सुनिल चंद्रसेन पाटील यांनी शासन दरबारी केली होती. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी केली असता त्यामध्ये अनेक कामात अनियमितता, काही कामात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर आयुक्तांनी सरपंच जवळकर यांनी खरेदी केलेल्या वस्तू, कामाची अनियमितता, गैरव्यवहार, कामाशी संबंध नसलेल्या व्यक्तींचे धनादेश काढले. यासह अन्य बाबींवर ठपका ठेवून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 31 (1) नुसार अपात्रतेची कारवाई केली आहे. या कार्यकाळामध्ये तब्बल 5 ग्रामसेवकांनी पिंपळनेरचा कारभार पाहितला. पैकी 4 ग्रामसेवकांवर अपहार प्रकरणात कारवाई होणार असल्याचे संकेत येत असून सरपंच आणि ग्रामसेवकांकडून अपहार केलेली रक्कम वसूल करून फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते.