बीड (रिपोर्टर): मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जन्मदिना निमित्त देशभरात रामनामाचा जप केला जात असून बीड शहरासह जिल्हाभरातल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांनी नतमस्तक होत सियावर रामचंद्र की जय चा जयघोष केला. तर बीडमध्ये आज सकाळी राम भक्तांनी मोटारसायकल रॅली काढली. सायंकाळच्या दरम्यान शहरामध्ये भव्य शोभायात्रा निघणार आहे.
अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर प्रथमच आलेल्या रामनवमीच्या निमित्ताने अयोध्येत विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. तसे देशभरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातही रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा हाते असून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. गावागावात राम नामाचा जप सुरू आहे. घराघरात प्रभू श्रीराम व सितेचे पुजन केले जात आहे. अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाचे आयोजन पहावयास मिळत आहे. तर बीड शहरामध्ये आज सकाळी बार्शी नाका येथील गणपती मंदिरापासून राम भक्तांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. हातात भगवे ध्वज घेत राम नामाचा जयघोष केला. सायंकाळी बीड शहरामध्ये प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मूर्तीसह शोभायात्रा निघणार आहे.