केज (रिपोर्टर): केज शहरामध्ये आठवड्यातून दोनदा बाजार भरतो, व्यापार्याकडून नगरपंचायत टॅक्स वसूल करते मात्र त्याबदल्यात व्यापार्यांना कुठल्याही सुविधा दिल्याजात नाहीत. गुत्तेदारांना पोसण्यासाठी टॅक्स वसुली केली जाते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधी सुविधा द्याव्यात व नंतर टॅक्स वसूल करावा, असा संताप व्यापारी व्यक्त करू लागले आहे. नगरपंचायतचा भोंगळ कारभार याला जबाबदार दिसून येत आहे.
केज शहरामध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस बाजाराचे असतात. बाजाराच्या ठिकाणी व्यापार्यांना सुविधा पुरविण्याचे काम नगरपंचायतचे असते. सुविधा पुरविण्यासाठी नगरपंचायत प्रत्येक व्यापार्याकडून टॅक्स वसूल करते. या टॅक्सपोटी नगरपंचायतला वर्षाला लाखो रुपये प्राप्त होत आहेत. व्यापार्यांना बसण्यासाठी सुविधा नाही, पाण्याची सोय नाही, शौचालय, मुतारीची सुविधा नाही. व्यापारी कुठेही बसून आपला व्यवसाय करत आहेत. नगरपंचायत केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहे. नगरपंचायतने आधी व्यापार्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नंतर टॅक्स वसूल करावा, अशी मागणी केली जात आहे.