माने कॉम्प्लेक्स परिसरात जाहीर सभा
बीड/सिंदखेडराजा (रिपोर्टर): अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी त्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ विदर्भ दौर्यावर असून सिंदखेड राजा जवळील एका प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी जिजाऊंच्या जन्मस्थळाची माती सोबत घेतली असून संघर्ष करत लोकसभेची लढाई जिंकण्यासाठी पंकजा उद्या अधिकृत रणांगणात उतरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन होणार असून महायुतीच्या कार्यकर्त्यात प्रचंड उत्सव पहायला मिळत आहे. तसे पंकजा यांनीही व्हिडिओद्वारे उमेदवारी अर्ज भरते वेळेस आलेल्या प्रत्येक जणाने नेमके काय करायचे यावर भाष्य केले आहे. त्याचबरोबर उद्या उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहनही केले आहे.
उद्या दि. 24 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करून कार्यकर्त्यांना आवाहन केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी तीन वाजता पंकजाताई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन माने कॉम्प्लेक्स भागात जाहीर सभा घेणार आहेत. तत्पूर्वी पंकजा मुंडे आज विदर्भात प्रचार दौर्यावर आहेत. सिंदखेडराजा जवळील एका गावात त्या आज दुपारी एक वाजता प्रचार सभेमध्ये बोलत होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, मी तिकडे बीडमध्ये कठीण लढाई लढत असतानाही मी इथे आले, ही गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, शक्ती देणं हे माझे काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक हात वर व्हावा म्हणून मी मराठवाडा सोडून विदर्भात आले आहे, मोदीजींनी जो विकास केला तेवढा विकास कोणीच केला नाही. विरोधक मोदींवर टीका करताना त्यांच्याच विकासाचे दाखले देतात हेही त्यांनी म्हटले. विकास कितीही करा, पक्षाला ताकद कितीही द्या, परंतु लढावं लागतच असंही त्या म्हणाल्या. जे गरिबाच्या घरी जन्म घेतात त्यांना गरीबीची जाण असते. स्व. मुंडे गरिबाच्या घरी जन्मले म्हणून आम्हाला त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवले. मोदींनाही गरीबीची जाण आहे. गरीबीची पिडा मोदींना चांगली माहित असल्याचे त्यांनी सांगून स्व. मुंडे मला नेहमी म्हणायचे, तुला सिंदखेडराजा येथून निवडणुकीसाठी उभा करणार आहे, तेव्हा ते तसे का म्हणायचे? हे समजत नव्हते. आता मात्र ते समजले. असं म्हणत जिजाऊंच्या जन्मस्थळाची माती त्यांनी आपल्या सोबत घेतली आणि त्या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी तेथेही सभेतून सांगीतले.