बीड (रिपोर्टर): राज्याच्या राजकारणाचा केेंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे ुन्हाची तीव्रता अधिक वाढत चालली असतानाच दुसरीकडे राजकारणाचं टेम्परेचरही तेवढच चाललं आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे येणार की? महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा येणार यावर जिल्हाभरात पैजा लावल्या जात आहेत. मिशीपासून ते रोख रकमेपर्यंतच्या या पैजा वातावरण अधिकच गरम करून सोडत आहेत.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्या बीड जिल्ह्यात 2024 लोकसभा निवडणूक अधिक रंगतदार होताना दिसून येत आहे. मतदानासाठी अवघे पाच दिवस उरले आहेत. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत होत असून मताच्या ध्रुवीकरणात वंचीतचे अशोक हिंगेंसह 40 उमेदवारांचा हातभार लागू शकतो. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची अन् अनिश्चिततेची होत आहे. त्यामुळे सोनवणे येणार की मुंडे येणार? यावर जिल्ह्यातल्या वाडी-वस्ती-तांड्यापासून शहरातल्या चौकाचौकात तीच चर्चा हाते आहे. आपआपले समर्थक आपआपल्या उमेदवारांची बाजू लावून धरत आहेत. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराची धुरा राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हाती घेतली असून ताईंसोबत भाजपासह अजित पवार गटाची फलटन कार्यरत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे एकटे लढाई लढत आहेत. मात्र आरक्षण मुद्दा आणि अन्य मुद्यावरून ही निवडणूक अधिकच चिवट होत असल्याने मुंडे येणार की सोनवणे येणार? यावर पैजा लावणे सुरू आहे. जेवढे निवडणुकीचे वातावरण गरम झाले आहे तेवढेच बीड जिल्ह्यात उन्हाचे टेम्परेचरही वाढले आहे. 42 अंश सेल्सियसपेक्षा अधिक टेम्परेचर बीड जिल्ह्यात पहायला मिळत आहे.