बीड/परळी (रिपोर्टर)बियाणी हत्याकांडाचा निषेध म्हणून परळीत सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. बियाणी यांच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करून त्यांना कडक शासन करावे अशा आशयाचे निवेदन शासनाला तहसील कार्यालयाच्या मार्फत देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा मुकमोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा मौलाना अबुल कलाम आझाद चौक, सिंचन भवन मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. झालेल्या घटनेने समाजाच्या भावना तीव्र झाल्या असल्याचे दिसून येत आहे. परळीत काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने माहेश्वरी बांधव आणि व्यापारी सहभागी झाले होते.

या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व माहेश्वरी समाजाला संरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन आज बीडमध्ये माहेश्वरी समाजाने जिल्हाधिकारी यांना दिले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देड येथील प्रसिध्द व्यवसायीक व माहेश्वरी समाजाचे कर्मठ कार्यकर्ते स्व. श्री संजयजी बालाप्रसादजी बियाणी यांचेवर भर रस्त्यात दिवसाढवळया गोळीबार करुन गुंड प्रवत्तीच्या लोकांनी निर्घुन हत्या केली. स्व. श्री संजयजी बियाणी हे थोर सामाजीक कार्यकर्ते होते. त्यांनी नुकतेच दिनांक २६.०४.२०२२ रोजी नांदेड येथील माहेश्वरी समाजातील गरजुवान व बेघर लोकांसाठी २१ रो हाऊसेस व ५२ सदनिका अत्यंत अल्पदरात उपलब्ध करुन दिल्या असुन स्व. श्री संजयजी बियाणी यांनी अतिशय काबाडकष्ट करुन शुन्यातुन विश्व निर्माण केले आहे. त्यांना समाजातील तळागाळाच्या लोकांविषयी अतिशय प्रेम व आस्था होती. त्यांच्या प्रगतीचा उल्लेख सतत उंचावत होता. त्यांचे हातुन अनेक चांगले समाजभिमुख उपक्रम पार पडले आहेत. ते अतिशय दानशुर होते. अशा थोर सामाजीक कार्यकर्त्याचा भररस्त्यात दिवसाढवळया गोळया घालुन खुन होणे ही अतिशय निंदणीय तथा चिंता करण्यायोग्य बाब आहे. आम्ही सकल राजस्थानी समाजाचे समस्त सदस्य या घटनेचा तिव्र निषेध करीत आहोत. राजस्थानी समाज आपल्या उद्योग व्यवसायांचे माध्यमातुन स्वतःचे चरितार्थ चालवणारा पापभिरु समाज आहे. राजस्थानी समाजातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील, चार्टर्ड अकाऊंटंटस, इ. आप-आपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देतात. अशा समाजातील एखादया व्यवसायीकाचा, भरदिवसा सार्वजनीक ठिकाणी गोळीबार करुन त्यांची हत्या करणे, ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे समस्त राजस्थानी समाजाच्या नव्हे तर संपुर्ण व्यापारी जगताचे मनावर खुप मोठया प्रमाणावर मानसिक आघात झाला असुन त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन खरे गुन्हेगार शोधुन त्यांना जास्तीत जास्त कडक शासन व्हावे. अशी आपल्या माध्यमातुन आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत. तर या प्रकरणातील आरोपींना आणि षडयंत्र रचणार्यांना तात्काळ करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींविरोधात कठोर कारवाई करावी तसेच माहेश्वरी समाजाला संरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना बीडमधील माहेश्वरी समाजाच्या वतीने देण्यात आले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.