पत्नीसह प्रियकरावर गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर) प्रियकराच्या मदतीने पतीला मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्नीवर कलम ३०६ प्रमाणे मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हास सीताराम पवार याने समनापूर शिवारातील समीर पाटोदकर यांच्या शेतात लिंबाया झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती.
उल्हास यांनी आत्महत्या करण्यापुर्वी त्याची पत्नी गीता उल्हास पवार आणि तिचा प्रियकर लक्ष्मण ऊर्फ मसू भागवत वायभट (रा. गोरेवस्ती ता. जि. बीड) या दोघांचे अनैतिक संबंध असून ते मला मानसिक त्रास देत आहेत, त्या दोघांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून उल्हास पवार यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी काल मयत उल्हास पवार यांचे बंधू राजेंद्र सीताराम पवार यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी लक्ष्मण ऊर्फ मसू भागवत वायभट आणि गीता उल्हास पवार यांच्य विरोधात काल गु.र.नं. ९८/२००२ कलम ३०६, ३४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे करत आहेत.