बीड (रिपोर्टर): बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ बीड जिल्हा शिवसेनेची शनिवारी (दि.11) सकाळी अकरा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. बार्शी रोडवरील हॉटेल ग्रॅड यशोदा येथे बैठक होणार असून यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक मार्गदर्शन करणार आहेत.
बीड लोकसभेची निवडणूक रंगात आली असून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक यांनीही गाठीभेटीवर भर दिला आहे. मुंडे यांच्या विजयासाठी जिल्हाभरातील शिवसैनिक सक्रीयपणे कार्यरत आहेत. येत्या दोन दिवसात जीवाचे रान करुन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निश्चय शिवसैनिकांनी घेतला आहे. 13 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असून जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड, माजलगाव, केज व परळी विधानसभा मतदारसंघात दोन, तीन दिवसांतील शिवसेनेची मोर्चा बांधणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार सचिव संजय मोरे व उपनेते अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख विजय पाटील व संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या सूचनेवरून आज शनिवारी (दि.11) सकाळी अकरा वाजता बीड जिल्हा शिवसेनेची हॉटेल ग्रॅड यशोदा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक उपस्थित राहणार आहेत. बैठकीस बीड , माजलगाव , केज व परळी विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख , उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख शाखाप्रमुख व शिवदूत तसेच, महिला आघाडी, युवा सेना, अल्पसंख्याक आघाडी, वैद्यकीय मदत कक्ष ,शेतकरी संघटनांचे सर्व पदाधीकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.









