सर्वाधिक मतदान आष्टी तर सर्वात कमी मतदान बीड विधानसभा मतदारसंघात
बीड (रिपोर्टर): 2024 च्या लोकभेसाठी झालेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानात बीड जिल्ह्याने राज्यात अव्वल नंबर मारल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात कधी नव्हे तेवढे लोकसभेसाठी 70.92 टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान हे आष्टी विधानसभा मतदारसंघात 74.79 तर सर्वात कमी बीड विधानसभा मतदारसंघात 66.09 टक्के झाले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली आहे. तब्बल 41 उमेदवार निवडणूक लढत होते.
अठराव्या लोकसभेसाठी काल बीड जिल्ह्यात मतदान झाले. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे, वंचीतचे अशोक हिंगे यांच्यासह 41 उमेदवार निवडणूक रिंणात होते. मात्र मुंडे-सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली. काल सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत मताचा टक्का कमी होता. मात्र त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात मताचा टक्का वाढत गेला. तब्बल 15 लाख 19 हजार 523 मतदारांनी मताचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये याआधी कधीही एवढे मतदान झाले नव्हते. सर्वाधिक मतदान हे आष्टी विधानसभा मतदारसंघात झाले. त्याठिकाणी 74.79 तर सर्वात कमी मतदान हे बीड विधानसभेमध्ये 66.09 एवढे झाले. गेवराई 71.43, माजलगाव 71.61, केज 70.31, परळी 71.31, अशी मताची टक्केवारी आहे. जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. त्याचप्रमाणे मुंडे-सोनवणे या दोन उमेदवारांनीही जास्तीत जास्त मतदान कसे करून घेता येईल याकडे लक्ष दिले होते.