गेवराईचा कृषी विभाग शेतकर्यांच्या मुळावर
गेवराई (रिपोर्टर) : यंदा वेळेवर पाऊस पडल्याने, शेतकर्यांनी पेरणीसाठी लगबग केली. जवळपास खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. मात्र, शेतकर्यांना खते मिळत नाहीत. शासनाकडून मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून दिलेले असताना, येथील ठोक व्यापार्यांनी खताचा तुटवडा दाखवून शेतकर्यांची लुट केली असून,तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी उंटावरून शेळ्याराखत असल्याने,शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, कृषी आयुक्त आर. बिनवडे यांचा शनिवार ता. 6 रोजी गेवराई तालुक्यात शासकीय दौरा आयोजित करण्यात आलेला असून, त्यांच्याकडे तक्रारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेवराई तालुक्यात यंदा वेळेवर पाऊस पडला. शेतकर्यांनी पेरणीसाठी लगबग केली. वेळेवर आलेल्या पावसाचा गैर फायदा घेऊन, गेवराई च्या कृषी व्यापार्यांनी विशेषत: ठोक इफको चे 10.26.26 आणि आरसीएफ चा युरिया आदि खतांचा तुटवटा निर्माण करून, गोरगरीब शेतकर्यांचा मानसिक छळ केला. मागणी केलेले खत उपलब्ध नाही. शासन स्तरावरून सदरील खते आलेले नाहीत. त्यामुळे, मागणी नसलेली व कंपनीकडून जास्तीचा नफा दिलेल्या खताचा आग्रह व्यापार्यांकडून केला जात आहे. परंतू , शेतकर्यांनी मागणी केलेली खते उपलब्ध आहेत. ऑनलाईन आकडेवारी दिसत आहे. गेवराई तालुक्यातील शेतकर्यांसाठी 400 टन 10.26.26 , 6290 टन आरसीएफचा युरिया आलेला आहे. एवढा टनाने खताचा साठा उपलब्ध असताना, ठोक व्यापारी खत उपलब्ध नसल्याचे सांगून, विशिष्ट एजंटकडून आलेल्यांना जादा भावाने खत उपलब्ध करून देत आहेत. गुरूवार रोजी एका एजन्सीकडून माहिती घेतली असता, 10.26.26 खत आलेच नाही. शासनाकडून अद्याप आलेले नाही. त्यामुळे, खत उपलब्ध नाही. असे सांगण्यात आले. पेरणीच्या वेळी बि-बियाणे खरेदी करतेवेळी ही त्रास झाला. आता पेरलेले उगवले आहे. उगवलेले जगवायची धडपड सुरू आहे. याचा गैरफायदा घेऊन, कृषी दुकानदार एजन्सी गोरगरीब शेतकर्यांची लुट करीत आहेत. धनदांडग्यांना मात्र, खत उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, गेवराई तालुका कृषी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी उंटावरून शेळ्या राखत आहेत. बि-बियाणे खताच्या बाजारपेठेत खत उपलब्ध असूनदेखील, खताचा तुटवडा निर्माण करणार्यांना अभय दिले जात आहे. खताच्या दुकानात जाऊन चौकशी केली जात नाही. एजन्सी धारकांचे गोडाऊन नियमित तपासले जात नाहीत. त्यामुळे, व्यापारी हे शेतकर्यांशी मुजोरी करतात. जिल्हा कृषी अधीक्षकांचे लक्ष नाही. सगळा आलबेल कारभार असून, साठेबाजांची तालुका, जिल्हा कृषी कार्यालयाचे अधिकारी पाठराखण करीत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. दरम्यान, शनिवार दि.6 रोजी कृषी आयुक्त आर. बिनवडे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर यात आहेत. बिनवडे यांच्याकडे साठेबाज व्यापार्यांच्या तक्रारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गोरगरीब मायबाप शेतकर्यांची लुट करणार्या गिधाड गँगला कोणी आवर घालणार आहे की नाही ? असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेवराई कृषी कार्यालयाकडून अनेक मंडळाच्या निविष्ठा
गायब, वरिष्ठांची मिलीभगत ; ना.धनुभाऊ तुम्हीच लक्ष घाला
पेरणीच्या मोसमात शासनाकडून कृषी विभागामार्फत येणारे बी- बियाने निविष्ठा कृषी कार्यालयाला प्राप्त झाल्या परंतु गेवराई तालुक्यातील अनेक मंडळाच्या निविष्ठा संबधित कृषी मंडळ अधिकार्यांनी खाली दिल्याच नसल्याने पेरणीचा मोसम संपून गेला तरी अद्याप अनेक मंडळातील शेतकर्यांना बी-बियाणे मिळाले नसून गेवराई कृषी विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून येथील संबधित अधिकारी ही मुजोरपणाने वागत असुन शेतकर्यांची लूट करत आहेत. याबाबत अनेकवेळा विविध वर्तमानपत्रातुन बातम्या प्रसिद्ध होत असताना वरिष्ठांकडून यांची पाठराखण होत असून या लुटीत वरिष्ठांची मिलीभगत आसल्याचे दिसून येत आहे. मात्र हा सर्व दुर्दैवी प्रकार कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडत असून ना. धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून गेवराई कृषी विभागाच्या अधिकार्यांना धडा शिकवावा अशी मागणी शेतकर्यांतुन होत आहे.














