बीड (रिपोर्टर): नेकनूर येथील मराठी, उर्दू माध्यमाच्या शाळेवर तीन शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभाग शिक्षकांची भरती करत नसल्याने आज ग्रामस्थ व पालकांनी जि.प. कार्यालयात मुलांची शाळा भरविली.
नेकनूरच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत 240 विद्यार्थी आहेत. या शाळेवर फक्त चार शिक्षक कार्यरत असून तीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षकांच्या जागा संदर्भात वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने आज गावकर्यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शाळा भरविली. या वेळी ग्रा.पं. सदस्य सय्यद साजेद अली, सय्यद कालेद, संजय शिंदे, जफरभाई, मुदस्सीर कादरी, पत्रकार अमजद पठाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती.










