विद्यार्थ्यांचे नुकसान, गावकर्यात संताप
मी चौकशी समितीत, क्लार्कने माध्यमिक विभागाचे आवक-जावक रजिस्टर घरी नेले
बीड (रिपोर्टर): जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुक्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर जिल्हा प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी सुतासारखे सरळ होत एका रेषेत चालतील, असे वाटत असतानाच शिक्षण विभागात गलथानपणा आणि गलथान कारभार पुन्हा सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेवराई तालुक्यातील मालेगाव खुर्द येथील नियुक्त शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून शाळेवर गैरहजर राहत शिक्षण अधिकार्याचा ड्रायव्हर म्हणून काम पहात आहे. शाळेवर विद्यार्थ्यांना अ अक्षरही न शिकवणार्या या चालकाचे एकीकडे पगार निघत असताना विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे तर दुसर्या प्रकरणामध्ये एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्याची चौकशी सीईओंनी लावली आणि ही चौकशी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकार्यासह अन्य दोन क्लार्कला नेमले मात्र यातील एका क्लार्कने आवक-जावक रजिस्टर गेल्या दोन महिन्यांपासून घरी नेत माध्यमिकच्या कर्मचार्यांना थेट धमकावणे सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणात आता सीईओंनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बीडच्या शिक्षण विभागामध्ये गलथानपणाचा नव्हेतर मनमानी पणाचा काही अधिकारी, कर्मचार्यांनी कळस गाठला आहे. गेवराई तालुक्यातल्या मालेगाव खुर्द येथील शाळेवर असणारा शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून शाळेत गैरहजर आहे. तो थेट प्राथमिक शिक्षणाधिकार्याचा ड्रायव्हर वजा पीए या भूमिकेत काम करत आहे. तिकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे मालेगाव खुर्दच्या मुख्याध्यापकाने संबंधित शिक्षकाचा पगार कसा आणि कुठून काढायचा ? असे पत्र शिक्षणाधिकार्यांना दिले आहे. तरीही संबंधित शिक्षकाचा पगार निघत असल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान करून संबंधित शिक्षक शिक्षणाधिकार्यांच्या गाडीखालचा होत असल्याने मालेगाव खुर्दच्या गावकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित शिक्षकाला तात्काळ मालेगाव खुर्द येथे ज्ञानर्जन देण्यासाठी हजर करावे, अशीही मागणी होत आहे. बीडच्याच शिक्षण विभागात एका कायर्कर्त्याने माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्याविरोधात तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली. या समितीमध्ये प्राथमिकचे शिक्षणाधिकारी फुलारी अणि दोन क्लार्कचा समावेश आहे. यातील एक क्लार्क हा अधिकृत पशुसंवर्धन विभागातला आहे मात्र त्याने डेपोटेशनवर शिक्षण विभागात काम करणे पसंत केले आहे. त्या कामामागे संबंधित क्लार्कचा वेगळा हेतू असल्याचे या प्रकरणात स्पष्ट झाले आहे. चौकशीच्या नावाखाली संबंधित क्लार्कने माध्यमिकचे आवक-जावक रजिस्टर गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या घरी नेऊ ठेवले आणि थेट माध्यमिकच्या कर्मचार्यांना तुमचा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे आहे. मला भेटा, नसता… अशा थेट धमक्या देत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ज्या तक्रारीत माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्यांची चौकशी करण्यासाठी या महाशयांना समितीमध्ये नेमण्यात आले होते त्यांनी समितीच्या अध्यक्षाला न विचारता थेट सीईओंकडे अहवाल सादर केला. एकूणच बीडच्या शिक्षण विभागात पुर्णत: मनमानी, अधिकार्यांची मर्जी आणि सावळा गोंधळ दिसून येत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या दोन्ही प्रकरणात लक्ष घालून दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं, अशी मागणी होत आहे.









