2024 मध्ये 17 लाख 14 हजार शेतकर्यांनी भरला पीकविमा
9 लाख 81 हजार शेतकरी अग्रीमसाठी पात्र
बीड (रिपोर्टर): 1 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 च्या दरम्यान 17 लाख 14 हजार पेक्षा अधिक शेतकर्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला. दिवाळीच्या आसपास पीक विम्याचे अग्रिम मिळणे अपेक्षीत होते, मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकर्यांना पीकविमा अग्रीम मिळाला नाही. सदरची प्रक्रिया आचारसंहितेमुळे रखडली गेली, पुढे डिसेंबर-जानेवारीत हे अग्रीम मिळेल, असे अपेक्षीत होते, मात्र आता मार्च महिना अर्धा होऊन गेलेला असताना अद्यापही पीकविमा अग्रीम मिळाला नसल्याने शेतकर्यात सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार खरीप 2024 मध्ये 17 लाख 14 हजार शेतकर्यांनी पीकविमा भरला, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या 9 लाख 81 हजार शेतकरी अग्रीमसाठी प्राप्त आहेत. यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकारात 6 लाख 78 हजार तर वैयक्तिक या प्रकारात 3 लाख शेतकरी असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. आधीच बीड जिल्हा दरडोई उत्पन्नात प्रचंड पिछाडीवर आहे. त्या जिल्ह्यातल्या शेतकर्याला आधार देण्यासाठी पीकविमा अग्रीम तरी लवकर द्या.
पीकविमा योजनेत अधिकाधिक शेतकर्यांनी सहभागी व्हावे यासाठी केवळ 1 रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केली होती. त्यामुळे या योजनेत अनेक शेतकरी सहभागी झाले होते. 1 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत 17 लाख 14 हजार शेतकर्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग नोंदवित आपली पिके संरक्षित केली होती. दरम्यान, खरीप हंगामातील पीकविमा नुकसानभरपाई ही सर्वसाधारणपणे दिवाळीच्या आसपास दिली जात असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. परंतु मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका असल्याने पीकविमा अग्रिम शेतकर्यांना देता आला नाही. आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली मात्र त्यानंतर लगेचच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अग्रिम मिळणे अपेक्षित होते. परंतु राज्याचा हप्ता मिळण्यास विलंब झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम थेट अग्रिमवर झाला आहे.
14 मार्च तारीख आली, अधिकृतरीत्या उन्हाळा सुरू झाला तर पावसाळ्यातील खरीप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने आणखी किती दिवस शेतकर्यांना वाट पाहावी लागणार आहे हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात 2024 खरीप हंगामाचे क्षेत्र 7 लाख 85 हजार 786 पेरणी क्षेत्र होते. त्यापैकी 7 लाख 74 हजार 848 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, तर दुसर्या बाजूला 7 लाख 75 हजार 662 एवढ्या क्षेत्रावर पीकविमा काढला गेला. एकूण पेरण्यांपैकी 19 हजार 186 हेक्टरचा पीकविमा भरला गेला नव्हता. खरीप 2023 मध्ये शासकीय जमीन दाखविल्याचा घोटाळा समोर आल्याने 2024 च्या खरीप हंगामात कमी प्रमाणात विमा भरला गेला.
नऊ लाखांवर शेतकरी पात्र
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप 2024 मध्ये 17 लाख 14 हजार शेतकर्यांनी पीकविमा भरला होता. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील नऊ लाख 81 हजार शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहेत. यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकारात 6 लाख 78 हजार, तर वैयक्तिक या प्रकारात 3 लाख शेतकरी आहेत. या शेतकर्यांना अग्रिम मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.








