Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड शुद्धीकरणात अडकली भुयारी गटार

शुद्धीकरणात अडकली भुयारी गटार


केंद्र सरकारने अमृत योजनेच्या नावाने नगर विकासाच्या उद्देशाने सुरू केली होती पाणी पुरवठा; ग्रीन स्पेस व भुयारी गटार योजना;
या योजनेला केंद्राचा ५० टक्के, राज्याचा २५ टक्के व नगर परिषदेचा २५ टक्के अशी निधीची तरतूद; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची काम करण्याची जबाबदारी
बीड शहरात दोन टप्प्यात होणार भुयारी गटारीचे काम, पहिल्या टप्प्यात १६५ करोड ८० लाख रूपये या योजनेवर होणार खर्च
गटारीचे काम सुरू असतांना एका मजुराचा मातीत दबुन मृत्यू तर पंचशील नगर भागातील शासकीय कर्मचारी विशाल धांडे यांचा गटारीच्या खड्‌ड्यात पडून झाला मृत्यू; अनेक जण जखमी झाल्याच्या घडल्या घटना
गेल्या अडीच वर्षापासून बीडकरांचा प्रवास उखडलेल्या रस्त्यातून; जुलै २०२० पर्यंत योजना पुर्ण करणे अपेक्षित होते परंतू कोरोनानंतर मलशुद्धीकरणसाठी जागेचा प्रश्‍न म्हणूनच योजना रखडलेली, अमृत योजनेला एक वर्षाची मुदतवाढ
मलशुद्धीकरण केंद्र व पंपींग स्टेशनसाठी नगर परिषदेने जागा उपलब्ध करून देण्याची गरज; भुयारी गटारीचे अनेक भागात काम पुर्ण
परंतू गटारीचे पाणी शुद्ध केल्याशिवाय नदीच्या पात्रात सोडता येणार नाही; नदी पात्रात गटारीचे पाणी शुद्ध करून सोडणे बंधनकारक
मयत मजुराला संबंधित विभागाने मध्यस्थी करून मोबदला मिळून दिला पण धांडे कुटुंबिय आजही न्यायाच्या प्रतिक्षेत, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील महिला पीएसआय तुपे या प्रकरणाचा करताय तपास
शिवाजीनगर पोलीसांनी संबंधित घटनेची माहिती घेण्यासाठी नगर परिषदेकडे केला पत्र व्यवहार; संबंधिताला अटक करण्याची प्रक्रिया सुरू
पोलीस तपासात धांडे यांचा मृत्यू गटारीच्या खड्‌ड्यात पडून झाल्याची दिली माहिती; नऊ मीटरचा खड्डा उघहा ठेवून मृत्यूस कारणीभुत असल्याचा गुन्हा दाखल
काही भागात चक्क नवीन आणि दर्जेदार सिमेंट रस्ते फोडून भुयारी गटारीचे अंडरग्राऊंड पाईपलाईनचे काम सुरू, या गटारी योजनेत कोट्यवधी रूपयाचे रस्ते उद्धवस्त झाले
मलशुद्धीकरण केंद्र तयार झाल्यावर दररोज साडेतीन करोड लीटर गटारीतून आलेले पाणी शुद्ध होणार; या पाण्यातून नगर परिषदला महसूल मिळण्याची शक्यता, औरंगाबाद पॅटर्न राबविण्याची गरज
गेल्या अनेक वर्षापासून नगर पालिकेच्या गटारीचे पाणी थेट नदीच्या पात्रात, भुयारी गटार कार्यरत झाल्यानंतर नदीचे पात्र दुषित होणार नाही
अनेक ठिकाणी गटारीचे चेंबर रस्त्याच्यावर आल्याने वाहनांना धडका बसू लागल्या तर काही ठिकाणी चेंबरखाली गेल्याने अपघाताची शक्यता
जोपर्यंत काम दर्जेदार व फिनिशिंग करून मिळत नाही तोपर्यंत गुत्तेदारांचे बीले रोखून धरा
मलशुद्धीकरण केंद्राच्या जागेच्या कारणाने गुत्तेदार सुरक्षित, नगर परिषदने तात्काळ जागा उपलब्ध करून दिली तर गुत्तेदाराचीही होणार पोलखोल
देशातील नद्या दुषित होण्यापासून वाचविण्यासाठी केंद्र शासनाने अत्यंत महत्त्वकांक्षी योजना म्हणून अमृत योजनेची सुरूवात २०१८ साली केली. या योजनेत नगर परिषदस्तरावर पाणी पुरवठा, ग्रीन स्पेस व भुयारी गटार अशा कामाचा समावेश करण्यात आला. या योजनेला केंद्र शासन ५० टक्के निधी देणार व उर्वरित निधी पैकी २५ टक्के निधी राज्य शासन व २५ टक्के नगर पालिका निधी उपलब्ध करून देणार अशी तरतूद या योजनेत करण्यात आली होती. बीड नगर पालिकेकडे मॅन पावर  कमी असल्याने या योजनेतील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून करून घेण्याचे ठरले. त्या प्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने जुलै २०१८ साली बीड शहरात भुयारी गटार या कामाची सुरूवात झाली. शहरातील नाल्या व गटारीचा प्रश्‍न एकदाच मार्गी लागणार या अपेक्षेने नागरिकात आनंद होता. पण तो आनंद जास्त दिवस टिकून राहिला नाही. भुयारी गटार योजनेसाठी शहरातील कोट्यवधी रूपयाचे बांधलेले रस्ते उखडून टाकण्याची वेळ आली. या १६५ कोटी ८० लाख रूपये योजनेच्या कामासाठी कोट्यवधी रूपयाचे रस्ते उद्धवस्त करावे लागले. कधी ना कधी हे रस्ते उखडून भुयारी गटार योजना भविष्यात करावीच लागली असती. परंतू या योजनेतून सुरू झालेले गटारी काम अत्यंत संतगतीने सुरू असल्याचे दिसून येते. गेल्या अडीच वर्षापासून बीड शहरातील नागरिक खड्‌ड्यातून प्रवास करत असून नगर पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित गुत्तेदारांकडून कामाची स्पीड वाढवून लवकर काम समाप्त करावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. या बाबत पाठपुरावा केला असता मल शुद्धीकरण केंद्रासाठी नगर पालिकेने जागा उपलब्ध करून दिली नसल्याने ही योजना शुद्धीकरणात अडकल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे सुरूवातीला ज्यावेळी भुयारी गटार योजनेच्या कामाची सुरूवात झाली आणि त्या पाठोपाठ नगर पालिकेतून होणार्‍या सुवर्ण महोत्सव सडक योजनेच्याही कामाची सुरूवात झाली. परंतू जमीन लेवल बरोबर नसल्याने काही भागात रस्त्यावर चेंबर वर आल्याचे दिसून येते. त्या चेंबरमध्ये दररोज अनेक वाहने आदळतात तर काही चेंबर रस्त्याच्या खाली गेल्याने वाहने थेट त्या खड्‌ड्यात जावून आढळतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून सुरूवातीलाच जमीन लेवल नियमाने घेतले असते तर आज कोट्यवधी रूपयाच्या रस्त्यावर चेंबर वर-खाली गेलेले दिसून आले नसते. अशा प्रकारे अत्यंत महत्त्वकांक्षी योजना सुरूवातीपासूनच कोणत्या तरी वादात अडकली असून आता तर  चक्क नगर पालिके अंतर्गत तयार झालेली दर्जेदार सिमेंट रस्ते फोडून भुयारी गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे या भुयारी गटारीच्या कामात दोघांचा बळी पण गेलेला आहे.

या संदर्भात संबंधित गुत्तेदारावर बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उप निरीक्षक मिना तुपे या करत आहेत.
जुलै २०१८ साली भुयारी गटारीचे काम सुरू झाले. शहरातील अनेक रस्ते या कामासाठी उखडावे लागले. कसेबसे काम सुरू झाले असता झमझम कॉलनीत भुयारी गटाराची माती खचल्याने एका मजुराचा त्या खड्‌ड्यात मातीत दबुन मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतांनाच व भुयारी गटारीचे काम प्रगतीपथावर असतांना अचानक कोरोनाचे संकट आले. त्यानंतर काही काळ हे काम बंद होते. नियमाने २० जुलै २०२० या दिवशी हे काम हँडओव्हर करणे अपेक्षित असतांना अमृत योजनेला कोरोनामुळे १ वर्षाचा जास्तीचा कार्यकाळ देण्यात आला. दरम्यान बीड शहरातील काम संतगतीने का होईना सुरूच होते. ऑगस्ट महिन्यात शहरातील पंचशिल नगर भागात भुयारी गटारीचे काम प्रगतीपथावर असतांना त्या परिसरात राहणारे औषध निर्माण अधिकारी विशाल धांडे हे आपल्या घराकडे जात असतांना गटारीसाठी खोदून ठेवलेल्या खड्‌ड्यात ते पडले. त्यानंतर ते आपल्या घरी दुसर्‍या दिवशी त्यांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. उघड्या गटारी ठेवल्यानेच हा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत मयताचे बंधु जालींदर धांडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित गुत्तेदारावर ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस  ठाण्याचे पीएसआय तुपे करत आहेत. या घटनेत नऊ मीटरची गटार उघडी ठेवल्याने मृत्यूस कारणीभुत धरण्यात आले. या प्रकरणात संबंधित पीएसआय यांनी नगर पालिका यांच्याशी पत्र व्यवहार केला असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती तुपे यांनी दिली आहे. संबंधीत धांडे कुटुंबिय न्यायाच्या प्रतिक्षेत असून त्यांना तात्काळ न्याय मिळावा यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशिल आहे. तसेच या भुयारी गटारीचे काम पुढे सुरूच असतांना सर्वात मोठा प्रश्‍न म्हणजे मल शुद्धीकरण केंद्राचा उपस्थित झाला. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळोवेळी नगर पालिकेला मलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतू अद्यापही मलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली असून संबंधित गुत्तेदार, नगर पालिका मलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देत नसल्याचे कारण सांगून स्वत:ची सुरक्षा करून घेत असल्याचे दिसून येत आहे. नगर पालिकेने तात्काळ शुद्धीकरणासाठी जागा उपलब्ध करून दिली तर संबंधित गुत्तेदाराची पोलखोल ही होणार यात काही शंका नाही.

तीन एक्करच्या जागेत होणार शुद्धीकरण केंद्र
गेल्या अनेक वर्षापासून शहरातील गटारीचे पाणी नदीत जावून नदीतील पाणी दुषित होते. म्हणून भुयारी गटार योजनेची सुरूवात करण्यात आली. जेनेकरून थेट दुषित पाणी नदीच्या पात्रात जाणार नाही. परंतू भुयारी गटार व यासाठी मलशुद्धीकरण केंद्र सोबतच तयार करणे गरजेचे आहे. परंतू मलशुद्धीकरणासाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने भुयारी गटारीचे काम झाले तरी पाणी नदीच्या पात्रात शुद्ध केल्याशिवाय सोडता येणार नाही. परंतू मलशुद्धीकरण हा भुयारी गटारीचा महत्त्वाचा भाग असतांनाही याकडे नगर प्रशासन लक्ष देतांना दिसत नाही. विशेष म्हणजे नदीच्या कडेला नगर पालिका हद्दीत नगर पालिकेच्या हक्काची मोठी जागा उपलब्ध आहे. जर मलशुद्धीकरणासाठी जागा उपलब्ध झाली तर लवकरच गटारीचे काम पुर्ण होणार आणि शुद्ध पाणी नदीच्या पात्रात सोडता येणार.

नगर पालिकेला महसूल प्राप्त होणार
बीड शहरातील पाणी भुयारी गटारीतून मलशुद्धीकरण केंद्रात जाणार ते पाणी शुद्ध करून नदीत सोडता येते परंतू औरंगाबाद पॅटर्न वापरले तर बीड नगर पालिकेलाही यातून महसूल प्राप्त होवू शकतो. औरंगाबाद महानगर पालिके अर्ंतगत मलशुद्धीकरण तयार करण्यात आले. दररोज या केंद्रातून साडेतीन कोटी लीटर पाणी शुद्ध होवून ते पाणी सध्या सुरू असलेल्या समृद्धी हायवेच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. तो पॅटर्न वापरून बीड नगर पालिकेने मलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध झालेले पाणी अपार्टमेंट बांधकाम किंवा काही शासकीय कामासाठी वापरण्यास बंधनकारक करून त्या पाण्यातून महसूल मिळवणे सोपे आहे. परंतू नगर पालिका स्वत:च्या फायद्याकडेही लक्ष देतांना दिसत नाही.

बीडकरांना दुसर्‍या टप्प्याची धास्ती
भुयारी गटारीचे काम बीड शहरात २ टप्प्यात होणार, सध्या एक टप्प्यात अख्ख बीड उखडून टाकलेलं आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसरा टप्पा म्हणजे अर्धे राहिलेले काम होणार. पहिलाच टप्पा गेल्या अडीच वर्षापासून पुर्ण झालेला नाही. या पावसाळ्यात नागरिकांचे अत्यंत भयान हाल झाले. पुढे आणखी २ वर्षे मलशुद्धीकरण केंद्र तयार होण्यास लागणार म्हणजे आणखी २ वर्षे नागरिकांना या भुयारी गटारीचा त्रास सहन करावा लागणार आहे. नगर पालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित गुत्तेदार यांच्यात जोपर्यंत समन्वय होणार नाही तोपर्यंत कामाला गती मिळणार नाही. यासाठी समन्वयातून काम लवकरात लवकर करण्याची गरज आहे. 

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...