
वीज कंपनीच्या अधिकार्यांची कर्तबगारी
चौकशीची मागणी
बीड (रिपोर्टर): परळी शहरात महावितरण कार्यालयातील अधिकार्यांनी वीज घोटाळा केल्याची माहिती समोर येत असून घोटाळा करण्याची पद्धत पहाता ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ ही स्थिती सदरच्या पद्धतीमध्ये अवलंबली आहे. परळी शहरातले तब्बल 21 खासगी ग्राहकांकडे असणारी हजारो आणि लाखो रुपयांची बाकी महावितरणच्या काही अधिकार्यांनी संगनमत करून थेट नगरपालिकेच्या नावे लावल्याचा प्रकार घडला आहे. खासगी लोकांकडून पैसे घेऊन हा प्रकार केल्याचे दिसून येते. सदरचे प्रकरण हे ब्रह्मदेव चाटे यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणल्याचे सांगितले जाते.
परळी शहरातल्या तब्बल 21 खासगी ग्राहकांचे बील थेट चीफ ऑफीसर नगर परिषद यांच्या नावे टाकल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. परळी येथील रमेश चाटे यांनी याबाबतची माहिती माहिती अधिकारातून मागितली तेव्हा हे प्रकरण समोर आले. अब्दुल मज्जिद महेबूब, अब्दुल समद अब्दुल, शेख पाशा, शंकरराव पेटेवार, कचरूलाल तातडे, शरद कराड, अरबाज नय्युम खान, अ.रहीम अ. मैनुद्दकीन, कैलास लाहोटी, रविंद्र टाक, मन्मथ उदगीरकर, वैजिनाथ झरकर, तारादेवी भन्साळी, पठाण अय्युब, गणपत ईटके, रमेश प्रभाकर डहाळे, शेख असरद, दिनेशकुमार जैन, सौ.बिंदरबीर सुरेंद्रसिंग, शेख असरद या लोकांकडे जास्तीत जास्त 1 लाख 28 हजार ते कमीत कमी 6300 पर्यंतचे बील आहे. या सर्व लोकांकडून 50 टक्के, 40 टक्के पैसे घेऊन सर्व 21 लोकांचे बील हे चीफ ऑफीसर नगर परिषद नगरपालिका गार्डन, चीफ ऑफीसर नगरपरिषद वॉटरवर्क, चीफ ऑफीसर म्युनिसिपल काऊन्सिल या नावाने टाकून दिले आहे. वीज कंपनीच्या अधिकार्यांकडून सदरचा प्रकार घडवून आणल्याचे लेखी निवेदन ब्रह्मदेव केरबा चाटे यांनी जिल्हाधिकार्यांना देऊन याबाबतची चौकशी करण्याची मागणी केली आहे.








