
मुंबई (रिपोर्टर): पंढरपूर आषाढी वारीला 19 जूनपासून सुरुवात होणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतील. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणार्या वारकर्यांना टोलमाफीची घोषणा सरकारने केलीय. 18 जून ते 10 जुलै या काळात पंढरपूरला जाणार्या मानाच्या पालखी मार्गावर टोलमाफी असणार आहे.
पंढरपूरला जाणार्या जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफी मिळेल. यासाठी पोलीस किंवा वाहतूक विभागाकडून गाडी क्रमांक, चालकाचं नाव इत्यादीची नोंद करून स्टिकर्स उपलब्ध करून दिली जातील. पंढरपूरला जाताना आणि पंढरपूरहून परत येताना 18 जून ते 10 जुलै या कालावधीत पालख्या, भाविक आणि वारकर्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी टोलमध्ये सवलत दिली जाईल. सदरचे पास हे परतीच्या प्रवासाला ग्राह्य असतील.
सर्व टोलनाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा तैनात करावी. परिवहन विभागानेही जादा बसेस सोडाव्या. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी एचएसपीने टोलनाक्यांवर पोलिसांची व्यवस्था करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन स्थितीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, तसेच राज्यातील इतर सर्व रस्त्यांवर रुग्णवाहिका आणि क्रेनची व्यवस्था करावी. मुंबई-कोल्हापूर-बेंगलोर, पुणे सोलापूर या मार्गावरही क्रेनची व्यवस्था करा असे आदेश संबंधित विभाग आणि अधिकार्यांना देण्यात आलेत. राज्यभरातून पंढरपूरला जाणार्या मार्गावर रस्त्यातील खड्डे भरणे, दुरुस्ती कामं, सूचना फलक लावणे इत्यादी कामं पूर्ण करून घेण्यास सांगण्यात आलं आहे.
राज्यातून पंढरपूरकडे येणार्या सर्व टोलनाक्यांवर आषाढी वारीच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या बसेसना टोल नाक्यातून सूट देण्यात येईल. राज्य परिवहन अधिकार्यांनी गरजेनुसार आवश्यक ते कुपन आणि पास परिवहन विभागाकडून घ्यावेत. टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत महामार्ग प्राधिकारी आणि टोलनाका व्यवस्थापनाने कार्यवाही करावी असंही राज्य सरकारने बजावलं आहे.









