
घटनास्थळावरून पिकअप चालक फरार
दिंद्रुड (रिपोर्टर)- बीड ते परळी रस्त्यावर अज्ञात पिकअप वाहन चालकाने स्कुटी चालवत असलेल्या इसमाला जोराची धडक दिल्याने इसमाचा मृत्यू झाला असून अज्ञात पिकअप वाहन चालकावर दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, 5 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दिंद्रुड जवळ बीड ते परळी रोडवर असलेल्या संभाजी पार्क येथे एका अज्ञात पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील असलेल्या पिकअप हा निष्काळजीपणे चालवून बाबासाहेब रोजेकर रा. चाटगाव ता. धारूर व त्यांचा मुलगा गणेश रोजेकर वय 14 वर्ष हे चाटगाव येथून दिंद्रुड कडे स्कुटीवर बसून जात असताना अज्ञात पिकअप चालकाने त्यांना जोराची धडक दिली या अपघातामध्ये बाबासाहेब रोजेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गणेश रोजेकर याला गंभीर दुखापत झाली. पिकअप चालक हा अपघात स्थळावरून पळून गेला. काल अज्ञात पिकअप चालकावर दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.








