
जायकोचीवाडी येथील संतप्त गावकर्यांचा रास्ता रोको
बीड (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील जायकोचीवाडी या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावकर्यांचे हाल होत आहेत. आमदार, खासदारांनी वेळोवेळी नुसते आश्वासन दिले. मात्र पक्का रस्ता केला नाही. आज संतप्त गावकर्यांनी पंढरपूर-खामगाव रस्त्यावर उतरून हा महामार्ग रोखून धरला. अर्धा ते एका तासाच्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पुर्णत: ठप्प झाली. सदरच्या रस्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व आझाद क्रांती सेनेने केले होते. या दरम्यान पोलीस अधिकार्यांसह अन्य संबधित अधिकार्यांनी घटनास्थळी येत मोर्चेकर्यांचे निवेदन स्विकारले.
गेल्या अनेक वर्षांपासून जायकोचीवाडी फाटा ते जायकोचीवाडी गावापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे सदरील गावातल्या नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. जो रस्ता आहे तो अत्यंत खराब आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहेत. सदरचा रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी शासन दरबारी आणि प्रशासन दरबारी गावकर्यांनी वेळोवेळी निवेदने दिले. निवडणुका आल्या की, आमदार-खासदार हे रस्त्याबाबत आश्वासने देतात. मात्र निवडणुका झाल्या की लोकांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतात. आज आझाद क्रांती सेनेच्या वतीने सदरचा रस्ता व्हावा या मागणीसाठी पंढरपूर-खामगाव या महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. शेकडो गावकरी रस्त्यावर उतरत पक्का रस्ता द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत संतप्त होत महामार्गावर ठिय्या मांडला. तब्बल अर्ध्या ते एक तासाच्या रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनासह वरिष्ठ अधिकारी डेरेदाखल झाले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी स्विकारले.






