
बीड शहरामध्ये कडकडीत शैक्षणिक बंद
पालकांचा संताप कायम, शिक्षणाचा बाजार मांडणार्या पवाराच्या संस्थांची चौकशी करा, नराधमांना दोन दिवसात अटक करा, नसता तीव्र आंदोलन
बीड (रिपोर्टर): गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासून फरार झालेला उमाकिरण शिक्षण संकुल, ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल आणि प्रोफेशनल कोचिंग क्लासेसचा सर्वेसर्वा विजय पवार व त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिक्षणप्रेमींनी आज जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांना निवेदन दिले तर दुसरीकडे या घटनेचा निषेध म्हणून बीड शहरात शैक्षणीक बंद पाळण्यात आला. गुन्हा दाखल होऊन 48 तास उलटून गेलेले असताना नराधम शिक्षकांना पोलिसांकडून अटक करण्यात येत नसल्याने पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे. आज दुसर्या दिवशीही उमाकिरण शिक्षण संकुल हे बंद होते. त्यामुळे नीटची तयारी करणार्या विद्यार्थ्यांत चिंता वाढली असून अनेक पालकांनी फीस वापस मागितली आहे.

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला बाजारीकरणाचे स्वरुप आणणारा विजय पवार हा या क्षेत्रातून कोट्यवधी रुपयांची माया जमवून शिक्षणाच्या क्षेत्रात दादा झाला होता. बीडच्या बाहेरून येऊन विजय पवार याने कोचिंग क्लासेससह खासगी इंग्लिश स्कुल आणि जिल्हा बाहेर काही कॉलेज त्याने काढले. येथील ट्युशन अथवा क्लासेसमध्ये येणार्या विद्यार्थ्यांचे नावे त्याने बाहेर काढलेल्या कॉलेजमध्ये टाकल्याचेही सांगितले जाते. पालकांबरोबर तो शासनाची फसवणुक करत असल्याचेही आता सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विजय पवार व त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर या दोन प्राध्यापकांनी एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला. त्या मुलीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होताच राजकीय वरदहस्त असलेला विजय पवार व त्यांचा साथीदार खाटोकर हा फरार झाला. घटना घडून 48 तास उलटल्यानंतरही पोलिसांना हे नराधम सापडत नाहीत. त्यामुळे संतापलेल्या शिक्षण प्रेमींनी आज दोन दिवसात आरोपींना अटक करा नसता बंदसह अन्य आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. आज पुन्हा त्याच्या उमाकिरण शिक्षण संकुल समोर घोषणाबाजी केली. पालकांनी याबाबत चिंता व्यक्त करत या घटनेचा निषेध आणि आरोपीच्या अटकेसाठी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही, शैक्षणिक बंद पाळण्यात आला. नराधम पवार व त्याचा साथीदार खाटोकर यांना तात्काळ अटक करा, ही मागणी आता जोर धरत आहे.
विजय पवारच्या शिक्षण संस्थांची चौकशी करा
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला बदनाम करणार्या आणि शिक्षणाचा बाजार बसवणार्या विजय पवार याच्या क्लासेससह काही शिक्षण संस्था बीडसह जिल्हाबाहेर आहेत. या सर्व शिक्षण संस्थांची चौकशी करा, अशी मागणी होत आहे.

ज्ञानेश्वरी स्कूलमध्ये शिक्षक टीकत नाहीत
विजय पवार याचे बीड शहरात ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूल आहे. त्याठिकाणी त्याचे आलिशान ऑफीस असून एक अँटी चेंबर आहे. हा त्या अँटी चेंबरमध्ये बसून असतो. याठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांना त्याचा त्रास सातत्याने पहायला मिळाला आहे. कोरोना काळामध्ये विजय पवार याने एक रुपयाही पालकांना सोडला नाही. पालक आता ओरडून सांगत आहेत. त्याचबरोबर या शाळेत महिला शिक्षक जास्त काळ टीकत नाहीत. सातत्याने नव्या महिला शिक्षक त्याठिकाणी येतात.
ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूलमधून पैशाची पिशवी बाहेर गेली?
शिक्षण क्षेत्राचा बाजार बसवणार्या आणि गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणार्या विजय पवारच्या इंग्लिश स्कूलमधून काल पैशे भरलेली एक पिशवी बाहेर गेल्याचे सांगण्यात येत आहे. विजय पवार हा फरार असून त्याच्या मदतीसाठी साम आणि दामचा उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचेही बोलले जाऊ लागले आहे.






