
माजलगावात किराणा दुकानावर, कुंदेवाडीच्या घरात तर जालन्यावरून येणारा पिकअप पकडला

माजलगाव/वडवणी (रिपोर्टर): जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी आल्यापासून गुटख्याविरोधात मोहीम उघडली. यात अनेक गुटखा माफियांनी धंदे सोडून दिले मात्र नव्याने काही गुटखा माफिये सर्रासपणे बीड जिल्ह्यात गुटख्याची अवैधरित्या विक्री करत आहेत. गेल्या 24 तासात वडवणी आणि माजलगाव पोलिसांनी गुटख्या विरोधात तीन कारवाया करत तब्बल 24 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल जप्त केल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटक्याची तस्करी होत असल्याचे समोर येते.
माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहरातील पाटील गल्लीत संजय शिवाजी होके याच्या दुकानावर छापा मारला असता त्याठिकाणावरून 37 हजार 462 रुपयांच्या गुटख्यासह 52 हजार 462 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे, अंगद घोडके यांनी जुना मोंढा भागात केली. तर कारवाई ही वडवणी तालुक्यातील कुंदेवाडी या ठिकाणी करण्यात आली. येथील संतोष बाबासाहेब कोटुळे याचंया राहत्या घरात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती वडवणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना झाल्यानंतर त्यांनी त्या घरावर छापा मारला. त्यावेळी सुमारे 3 लाख 272 रुपयांचा गुटखा मिळून आला.
या कारवाईत व्हगाडे यांच्यासोबत पोलीस विलास खरात, बिभिशन गुंजाळ, नवनाथ लटपटे, किरण इरमले, वसंत कर्हे यांनी ही मोठी कारवाई केली. तिसरी कारवाई माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील पोलीस निरक्षक्षक बालक कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. जालना येथून एक बोलेरो पिकअपमधून गुटखा माजलगावात येणार आहे, त्या आधारे पोलिसांनी मिडसांगवी पुलाजवळ सापळा रचला. त्यावेळी पिकअप (क्र. एम.एच. 44 यू. 0268) हा भरधाव वेगात आला. थांबण्याचा इशारा केला असता तो भरधाव वेगाने पुढे गेला. त्याचा पाठलाग पोलिसांनी केला तेव्हा टाकरवण तलावाजवळ चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. पिकअपची झाडाझडती घेतली असता तब्बल 11 लाख 53 हजार 625 रुपयांचा गुटखा मिळून आला. मुददेमालासह ही किंमत 20 लाख 53 हजार 625 वर गेली. सदरची कारवाई ही वडवणी आणि माजलगाव पोलिसानीं केली.








