.

बीड (रिपोर्टर) –
अल्पवयीन विद्यार्थिनीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना आज न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे शिक्षण घेणारी 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खाटोकर या दोघांनी आपला वर्षभर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दिली होती या मुलीला वर्षभरापासून हे दोघे जाणीवपूर्वक त्रास देत होते तिच्या शरीराला हात लावत तिला कपडे काढून फोटो काढले गेले असे देखील तिने तक्रारीत म्हटले आहे हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस ठाण्याचे सातपथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती
घटना कळतात वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे लोक यांनी उमाकिरण शैक्षणिक संकुल समोर आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती तसेच आरोपी अटक न झाल्यास सोमवारी बीड बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास प्रशांत खाटोकर हा धाराशिव येथून पुण्याकडे मांजरसुंबा मार्गे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच प्राध्यापक विजय पवार हा देखील नगरहून त्याला जॉईन होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने सापळा रचून या दोघांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.





