
मराठवाड्यात 47 हजार 868 नोंदी
बीड, (रिपोर्टर)ः- मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने नोंदी आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत मराठवाड्यात 2 लाख 26 हजार 217 कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच 397 अर्ज नाकारण्यात आलेले आहेत. यात सर्वाधिक 1 लाख 53 हजार 356 प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात वितरित करण्यात आलेले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणापत्र नोंदणी तपासण्यासाठी शिंदे समितीची स्थापना केली होती. त्यानुसार मराठवाड्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात कोणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी संपूर्ण राज्यातही आंदोलन करण्यात आले होते. बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात 1 लाख 53 हजार 356 प्रमाणपत्र वाटप झाले आहे तर जिल्ह्यात 22 हजार 515 नोंदी आढळलेल्या आहेत.






