सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरण कार्यालयाची टोलवाटोलवी
रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत?

बीड, (रिपोर्टर)ः- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरी वेस या दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे वाहन धारकांना वाहने चालविण्यास विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात तर या रस्त्यावर तलावासारखी परिस्थिती निर्माण होते. हा रस्ता पुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. या रस्त्याच्या दुरूस्ती बाबत बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता ते म्हणतात सदरील रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे गेला आहे. हायवेच्या अधिकार्यांना विचारले असता ते म्हणतात हा रस्ता नगर पालिकेकडे गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येते. नेमकं रस्ता हा कोणत्या कार्यालयाअंतर्गत आहे हे समजेना. या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी निधी आला नव्हता का ? आला असेल तर कोणी खाल्ला? यासह अन्य प्रश्न उपस्थित होत आहेत.
बीड शहरातील अनेक रस्ते खराब आहेत. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरी वेस या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता एवढा खराब झाला आहे की त्याच्यावर वाहने चालविणे मुश्किल होत आहे. खराब रस्त्यावर डागडुजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो तो निधी नेमका कुठे जातो ? खड्डे बुजविण्यासाठी आलेला निधी खाल्ला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी तोंडे, बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हा रस्ता पुर्वी आमच्या अंतर्गत होता पण तो आता राष्ट्रीय महामार्गाकडे गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या डागडुजी बाबत आम्ही काही सांगू शकत नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता भोपळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा रस्ता आमच्या अंतर्गत नाही, तो रस्ता आमच्या अंतर्गत येवूच शकत नाही, सदरील रस्ता नगर पालिकेच्या अंतर्गत आहे. नगर पालिकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होवू शकला नाही. रस्त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगर पालिका यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. रस्ता दुरूस्त करावा अशी एकमेव मागणी येथील नागरीकांची आहे. मात्र रस्ता नेमका आहे कोणाच्या अंतर्गत हेच समजायला मार्ग नाही. अधिकारी तर फक्त उडवा उडवी करत आहेत. याची दखल जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी घ्यावी.






