
दोषी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत
महिला आयोगाचे तपासावर बारीक लक्ष-रूपाली चाकणकर
बीड, (रिपोर्टर)ः- बीड येथे उमाकिरण शैक्षणिक संकुलात शिकवणी वर्गात मुलींवर झालेला अत्याचाराचा प्रकार हा अतिशय विक्रृत मानसिकतेचा कळस आहे. 2023 पासून या शिकवणी वर्गामध्ये पुर्वीही दोन गुन्हे घडलेले आहेत. हा प्रकार पालक आणि विद्यार्थी दोघांनाही अस्वस्थ करणारा आहे. उमाकिरण संकुलामध्ये आयसीटी कमिटी नाही, विद्यार्थी पालक, शिक्षक याचीही समिती नाही. आरोपी शिक्षक प्रशांत खाटोकर व संचालक विजय पवार हे दोघेही कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. एसआयटी मार्फत महिला अधिकारी याचा कसून तपास करणार आहेत. या तपासावर महिला आयोगाचेही अतिशय बारकाईने लक्ष आहे असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी केले.
रूपाली चाकणकर ह्या बीड जिल्हा दौर्यावर आल्या असून आज सकाळी त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. पत्रकार परिषद घेण्यापुर्वी त्यांनी पिडीत विद्यार्थिनीची आणि तिच्या कुटूंबाची भेट घेतली. मानसिक आधार देत दोषीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे आश्वासनही त्यांनी पिडित विद्यार्थीनीच्या कुटूंबियांना दिले आहे. आरोपी प्रशांत खाटोकर आणि शिकवणी वर्गाचे संचालक विजय पवार यांना बीडमधून बाहेर पडण्यासाठी मदत करणारे अजय नारायण बोदरे यांनाही तपासाकामी पोलिसांनी नोटीस दिली आहे. संचालक विजय पवार यांच्या शिकवणी वर्गात 2023 मध्ये दोन विद्यार्थिनीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता.
त्यावेळीस संबंधित विद्यार्थीनीने आणि त्यांच्या पालकांनी जि.प.सीईओ यांना तक्रार ही केली होती. मात्र ही तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली असती तर त्यावेळेस त्यांनी ती गांभीर्याने घेतली असती आणि आता जो उमाकिरण संकुलात प्रकार घडला तो घडला नसता असेही चाकणकर यांनी सांगितले. 2023 मध्ये त्रास दिलेल्या दोन विद्यार्थीनीच्या पुरवणी जवाबावरून पोलिसांकडे गुन्हा नोंद होईलच. बीड शहरातील जेवढे शिकवणी वर्ग आहेत त्या सर्व शिकवणी वर्गामध्ये विद्यार्थी पालक समिती, आयसीटी कमिटी, सीसीटिव्ही व महिला कर्मचारी आहेत की नाहीत? या बाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या आहेत.
उमाकिरण संकुलामधील सीसीटिव्ही फुटेज, लॅपटॉप आणि मोबाईल ही सर्व उपकरणे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेली आहेत. उमाकिरणच्या तपासाबाबत जिल्हा महिला बालकल्याणचे अधिकारीही लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे अशा प्रकारची विकृत मानसिकतेचे गुन्हेगार कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या कसाट्यातून सुटणार नाहीत याची गांभीर्याने दखल महिला आयोग घेत आहे असेही यावेळी चाकणकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला पोलीस अधिक्षक नवनीत काँवत हे ही उपस्थित होते.





