
शिवाजीनगर पोलिसात दुसरा गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): उमाकिरण शिक्षण संकुलमधील क्चलासेसमध्ये शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला शिक्षक विजय पवार व त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एक वर्षापुर्वी अन्य एका विद्यार्थिनीचा छळ करण्यात आल्याचे व त्याबाबतच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे दिल्याचे पालकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली होती. आज अखेर शिवाजीनगर पोलिसात विजय पवार व त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर या दोघांविरोधात पोस्कोसह अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यघातल्या शिक्षण क्षेत्रात नाव कमावलेला शिक्षक विजय पवार व त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर यांचे कुकर्म आता बाहेर येत आहे. सर्वप्रथम त्यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. काल या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या दोघांनी क्लासेसमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी आता येत आहेत. आज पुन्हा एक गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापूर्वी माजी सैनिकाच्या मुलीचा छळ करण्यात आला होता. त्याबाबतची तक्रार संबंधितांनी शिक्षण विभागाकडे केली होती. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पालकांनी पत्रकार परिषद घेऊन सदरची माहिती दिली होती. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले होते. काल महिला आयोगाच्या अध्यक्षा बीडमध्ये डेरेदाखल होत पोलीस अधिक्षकांना या प्रकरणी काही सूचना केल्या होत्या. अखेर विजय पवार व खाटोकर यांच्या विरोधात दुसरा एक लैंगिक चळासह अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार आणि खाटोकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.





