
बापाची चप्पल लेकाला आली की तिथे बाप लेकाचं नातं राहत नाही. तिथं मित्रत्वाचं नातं निर्माण करावं लागतं असं आमच्या बापाने सागितलं. म्हणून महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात बाप असतांना इतर राज्यांना आणि तेथील नागरीकांना मित्रत्वाच्या नात्याने सख्यापोरासारखं महाराष्ट्रामध्ये जपत आलं आहे. पण काही वड्या वगळीच्या पैदाशी महाराष्ट्राच्या मित्रत्वाशी अन् पितृछत्राशी नतदृष्टपणा करतात तेव्हा साहजिकच तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. तुमचे सत्ताकारणाचे गणीत जुळवण्यासाठी कधी जातीयवाद निर्माण करायचा, कधी प्रांतवाद निर्माण करायचा, तर कधी भाषावाद निर्माण करून देशात आणि राज्या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करायची, हेच भारतीय जनता पार्टीचे धोरण असेल तर ते इतर राज्यात राबवा या धोरणातून महाराष्ट्राची बदनामी करणार असाल तर महाराष्ट्र सहन करणार नाही. याचा प्रत्यय पहिलीपासून इंग्रजी सक्तीबाबत घेतलेला निर्णय आणि त्यानंतर राज्यभरात उमटलेल्या पडसादावरून भाजपाच्या लक्षात आलेच असेल. आपण घेतलेला निर्णय महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमुळे परत घ्यावा लागला. आपला तिथे पराभव झाला याचा दुखवटा नव्हे तर सल भाजपाच्या मनामनात सलताना दिसतेय. म्हणूनच भाजपाचे उपटसुंबे महाराष्ट्रावर गरळ ओकतात.
कोण हा दुबे?
त्याचे कर्तृत्व काय?
भाजपाचा हिंदी भाषीक खासदार निशीकांत दुबे यांनी एक ट्विंट केलं आणि त्यामध्ये त्यांनी हिंदी भाषीकांना मुंबईत मारणार्यांनो जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषीकांना मारून दाखवा, उत्तरेत या तुम्हाला उचलून आपटतील. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ हे स्वत: ठरवा. हे ट्विट राजकीयदृष्ट्या ठाकरेंबाबत होतं. या राजकीय आरोप प्रत्यारोपावर आम्ही भाष्य केलं नसतं. परंतू निशिकांत दुबेंनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीतून देशासाठी महाराष्ट्राचे योगदान काय असा सवाल केला. यापुढे जात महाराष्ट्राच्या कोणाच्या पैशाची भाकरी खातो, तिकडे टाटा बिरला, रिलायन्स असेल पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय. तुम्ही कोणता टॅक्स आणता, असे मुक्तफळे उधळत महाराष्ट्र नावाच्या बापालाच दुबेंनी सवाल केले. दुबेंना आमचं सांगणंय तुम्ही ज्या प्रांतातून येता तिथं थोडं खाली वाकून बघा, महाराष्ट्राचे जे गुडघे फुटलेत ना ते तुमचा प्रांत उभा करण्यासाठीही. नसेल माहित तर एकदा इतिहास बघा मग महाराष्ट्राची ताकद कळेल. म्हणे महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय.
देशात महाराष्ट्राची काय ताकद
भाजपाचे खा.निशीकांत दुबे यांच्या अज्ञानावर प्रकाश टाकण्यासाठीच आज आम्ही व्यक्त होतो. दुबेंना हे माहित नसेल महाराष्ट्र हे भारताच्या जीडीपीमध्ये महत्त्वपुर्ण योगदान देणारे राज्य आहे आणि सातत्याने सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे स्थान मिळवत आले आहे. भारताच्या नाममात्र जीडीपीच्या अंदाजे 13.5 ते 14 टक्के वाटा महाराष्ट्राचा असतो. राज्याची आर्थिक ताकद त्यांच्या विविध औद्यागिक पाया मजबूत पायाभूत सुविधा आणि उच्च पातळीच्या थेट परकीय गुंतवणूकीमुळे आहे. भारतामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक, एफडीआय, एमआयडीसी नुसार देशाच्या एकूण परकीय थेट गुंतवणूकीपैकी 29 ते 30 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. जे राष्ट्रीय एकूण उत्पन्नाच्या 13.8 टक्के आहे. देशातले असे काही राज्य आहेत. ज्याचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेपेक्षा कमी आहे. ही आहे महाराष्ट्राची ताकद. हे जे आम्ही या ठिकाणी आकडे दिले हे तुमच्याच सरकारने दिलेले आहेत. राहिला
प्रश्न महाराष्ट्राच्या ताकदीचा
महाराष्ट्राची ताकद आणि हिंमत सह्याद्रीच्या काळ्या कातळासारखी निबर आणि हिमालयासारखी खंबीर होती म्हणूनच दुबे तुम्ही आज हिंदी का होईना बोलू शकलात. महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची ताकद काय होती त्या अब्दुल्याच्या समाधीला जावून विचारा, त्या औरंग्याच्या समाधीला जावून विचारा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचा पण बांधला. पुणे परगण्यात सोन्याचा नांगर फिरवत पडीक जमीन कसण्यायोग्य केली तिथूनच मराठी माणसाचा आणि महाराष्ट्र धर्माचा लढवय्या बाणा अवघ्या देशभरात पसरला. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातल्या अठरापगड जातीतल्या तरुणांना एकत्रीत केले. मावळा म्हणून स्वराज्य रक्षणासाठी लढवय्या बनवलं. महाराष्ट्र लढता ठेवला आणि स्वराज्य निर्माण केलं. महाराष्ट्राची ताकद काय? दुबेंना जर अजूनही शंका येत असेल जर ज्या माणसाने स्वराज्य उभं केलं आणि त्यानंतर त्याच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा ज्या छत्रपती संभाजी राजांनी विस्तार केला त्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास दुबेंनी एकदा वाचावा. मग महाराष्ट्राची ताकद कळेल. त्या 107 हुतात्म्यांच्या बलिदाणावर हा जेव्हा महाराष्ट्र उभा राहिला ना, ती बलीदान देण्याची क्षमता या महाराष्ट्राला त्यांचे बाप जादे छत्रपती शिवराय यांनी दिली. हे निशिकांत दुबेंना माहित नसावे.
महाराष्ट्र घामाची भाकरी खातो
भाजपाचे खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्र कोणाच्या पैशाची भाकरी खातो? असा एक सवाल विचारला. निशिकांत दुबे थोडी तरी लाज बाळगा. या महाराष्ट्रात घामाचं रक्त ओकत शेतकरी, मढे झाकुनिया करितो पेरणी, कुणबियाची वाही लवलाही म्हणजे घरात एखाद्याचा मृत्यू झाला तरी आमचा शेतकरी बाप ते मढं अगोदर टोपल्याखाली झाकतो आणि आधी पेरणी करतो. हे फक्त महाराष्ट्रातच होवू शकतं. इथला कष्टकरी कामगार अहो सोडा सुशिक्षित बेरोजगार स्वत:च्या ताटामध्ये जर चत्कोर भाकरी असेल ना तर त्यातली आर्धी भाकरी उपाशीपोटी येणार्या परप्रांतियाला देतो. दुबेंनी थोडी तरी लाज बाळगायला पाहिजे होती. महाराष्ट्राबद्दल बोलताय, अहो तिथं दिल्ली शंभर पन्नास किलोमिटरवर असतांना उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हरियाना, पंजाब या राज्यातून कितीतरी लोक पोट भरण्यासाठी शेकडो हजारो किलोमिटर लांब महाराष्ट्रात येतायत. होय त्यांना पोसण्याचं काम महाराष्ट्र करतोय आणि तुम्ही सांगतायत महाराष्ट्र कोणाची भाकरी खातोय, महाराष्ट्राजवळ काय आहे, अरे महाराष्ट्र आहे म्हणून दिल्ली आहे. छत्रपती शिवरायांचा काळ तर सांगितला अहो इंग्रजाच्या काळातही महाराष्ट्रातले निधड्या छातीचे वीर स्वत:च्या छाताडावर जेव्हा गोळ्या घेत राहिले तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळाले. अहो दुबे जेव्हा या देशावर संकट आले तेव्हा याच महाराष्ट्राचा माणूस संरक्षण मंत्री होण्यासाठी दिल्लीत गेला तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे मथळे महाराष्ट्राने तर छापले, पण तुम्हीही छापले, तुमच्या राज्यानेही छापले अन् तुम्ही विचारताय महाराष्ट्रात काय? निशिकांत दुबेंसारख्या महाराष्ट्रद्रोही माणसाला तुकोबांच्या भाषेत बोलायचेच झाले तर
‘तुका म्हणे ऐशा नरा मोजुनिया मारा पैजरा!’
हिच भाषा दुबेंना समजेल. दुर्दैवं याचं वाटतं, ज्या महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली. ज्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार आहेत. आजही भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आहे, त्याच भारतीय जनता पार्टीचे खासदार मराठीबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल गरळ ओकत असतील तर सत्ताधार्यांनी दुबेंसारख्यांचे तोंड बंद करायला हवे. परंतू दिल्ली तख्तावर बसलेला आका एखाद्या बोक्यागत महाराष्ट्रासारख्या लोण्याच्या गोळ्यावर लक्ष ठेवून आहे आणि तो लोण्याचा गोळा कधी भाषावाद, प्रांतवाद करून हिसकावण्याचा प्रयत्न होतोय हे माहित असतांना महाराष्ट्र भाजप अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतं. तेव्हा एक मराठी माणूस म्हणून या राज्यातल्या प्रत्येक माणसाला बोलावं लागेल. गेल्या पंधरा, वीस वर्षाच्या कालखंडामध्ये सत्ताकारणाच्या गणीतात जे काही गलिच्छ राजकारण देशभरात सुरू आहे, त्या गलिच्छ राजकारणांचे शिंतोडे महाराष्ट्रात नुसते उडाले नाही तर त्या गलिच्छ राजकारणात अक्षरश: महाराष्ट्र डुबून गेला अशा स्थितीत पुन्हा केवळ
सत्ताकारणासाठी महाराष्ट्राच्या इभ्रतीला हात
घालण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर हा महाराष्ट्र सहन करणार नाही. जेव्हा केव्हा राज्यात आणि देशात निवडणूका येतात तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टी असे उद्योग करते हे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. आता मुंबई महापालिका आणि तिकडे बिहारच्या निवडणूका पाहता प्रांतवाद आणि भाषावाद हे मुद्दे भाजप पुढे करू पाहतयं का? एकीकडे ठाकरेंच्या भुमिकेला विरोध करताना हिंदी भाषीकांचे कैवारी म्हणून घ्यायचे आणि बिहारमध्ये निवडणूक लढवायची, देशाच्या कुंच्याही ठिकाणी बिहारी गेले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असं दाखवून मतदान घ्यायचं हे एक महाराष्ट्राच्या इभ्रतीला हात घालण्याचं प्रमुख कारण आहे का? की मुंबई महानगरपालिका निवडणूकीबाबत चाचपणी आणि पेरणी चा या वादातून हेतू आहे का? असे एक ना अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टीला विचारावे लागतील. परंतू राजकारणासाठी आणि सत्ताकारणासाठी महाराष्ट्रासारख्या कर्तृत्ववान राज्याला तुमच्या भिकारचोट वक्तव्यातून बाटवू नका.





