जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील गावांची यादी निश्चित
हरकती सूचना लेखी स्वरूपात मांडण्याचे आवाहन
बीड, (रिपोर्टर)ः- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीबाबत राज्य पातळीवर हालचालींना वेग आल्याचे एकीकडे दिसून येत असतांनाच दुसरीकडे बीड जिल्हा अधिकार्यांकडून जि.प. निवडणूकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण आदेश आज काढण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि गणातल्या गावांची निश्चिती प्रारूप विभाग रचना करण्यात आली असून तशा आशयाची यादी आज जाहिर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये उद्याच्या निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात 61 गट असणार आहेत तर 11 तालुक्यातील 11 पंचायत समितीसाठी 122 गण असणार आहेत.
येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या दहा वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे विविध पक्षाचे नेते आप आपल्या तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपलेच अधिराज्य असावे यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपाने तर आज पासून आढावा बैठका राज्यभर घ्यायला सुरूवात केली आहे. राज्य पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेबाब हालचालींना वेग आलेला असतांना बीड जिल्हाधिकार्यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने विभागीय सरचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विभागाची एकूण संख्या आणि त्याचे क्षेत्र हे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आज जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार नागरिकांकडून हरकती सूचना लेखी स्वरूपात पुढील सात दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्यात असे म्हंटले आहे. पुढे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या प्रारूप विभाग रचनेविषयी हरकती नोंदविता येतील यासाठी संबंधितांनी पुरावे व आवश्यक दस्ताऐवज आणणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यातील जि.प.चे 61 गट आणि 122 गणात गाव निश्चित करण्यात आले आहेत.








