
7 तारखेला एकाच दिवशी जिल्ह्यात 30 लाख वृक्षांची लागवड
जोपासण्याची जबाबदारी प्रशासन घेणार
किमान 70 टक्के वृक्ष जगवण्यासाठी प्रशासन तत्पर -जिल्हाधिकारी
बीड (रिपोर्टर): जिथे वृक्षांची संख्या 33 टक्के असायला पाहिजे त्या बीड जिल्ह्यात केवळ अडीच टक्के वृक्ष असल्याची धक्कादायक माहिती आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन याचंया पत्रकार परिषदेतून समोर आली. त्या अनुषंगाने राज्यात हरित बीड उपक्रमांतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन सुरू केलं आहे. त्याअंतर्गत हरित बीड या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यात वर्षभरात तब्बल एक कोटी झाडांची लागवड केली जाणार असून त्याचे संगोपनाची जबाबदारीही प्रशासन स्वीकारणार आहे. ही दिलासादायक माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली. त्या अनुषंगाने 7 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी 30 लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. बीडमध्ये खंडेश्वरी परिसरात 15 हजार झाडे लावले जाणार आहेत, अशी माहिती जॉन्सन यांनी दिली.
ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, विभागीय वन अधिकारी गर्कळ, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारने राज्यभरात हरित महाराष्ट्र ही मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्यात येऊन पावसाचे होत चाललेले अल्पप्रमाण सुधारण्यास मदत होईल. सात ऑगस्ट रोजी शहरातील खंडेश्वरी देवी मैदान परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याच दिवशी जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था या सर्वांच्या माध्यमातून वनीकरण विभागाच्या जागा, स्थानीक स्वराज्य संस्थेच्या जागेमध्ये ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ही वृक्ष लागवड करताना जीओ टॅगिंग आणि क्युआर कोडचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून नेमून दिलेल्या जागेवर वृक्ष लागवड केली आहे का? प्रत्येक वर्षी ते झाड जोपासले जाते का? जीवंत आहे का? याची माहिती क्णयूआर कोडच्या माध्यमातून अद्यावत करण्यात येणार आहे. ज्या ज्या विभागाने ही वृक्ष लागवड केली आहे त्याच्यावर झाड जोपासण्याची जबाबदारी निश्चित केलेली आहे. झाड लावण्यासोबतच त्याचे काटेरी कुंपन आणि त्या झाडाला मिळणारे पाणी याचेही नियोजन करण्यात आलेले आहे. एका दिवशी तीस लाख वृक्ष लावणारे राज्यातील बीड जिल्हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरणार आहे.
याच दिवशी ऊसतोड कामगारांचा मेळावा
वृक्षलागवडीच्या मोहिमेसोबतच 7 तारखेला बीड शहरातील छत्रपती संभाजी क्रीडा संकुल येथे जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये या ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी, प्रथमोप्चार कीट आणि ऊसतोड कामगारांच्या योजना याबाबत माहिती दिली जाणार आहे. सोबतच प्रत्येक गावामध्ये ‘मिशन आरोग्य साथी’ म्हणून एका ऊसतोड कामगाराची निवड केली जाणार आहे. त्याला प्रशिक्षीत केले जाणार आहे आणि या मिशन आरोग्य साथी ज्या कारखान्याला ऊसतोड कामगार जाणार आहेत त्याच्या सोबत जाणार असून ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत तो गावपातळीवरील आशा वर्करशी संपर्कात राहणार आहे. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातून किती ऊसतोड कामगार जाणार आहेत याचा सर्वे करण्यात येणार असून त्याला एक ओळखपत्रही दिले जाणार आहे.
वन अधिकारी गर्कळ गळाले
या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा वन अधिकारी गर्कळ यांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. किती सॉ मीलवर कारवाया झाल्या? जिल्ह्यात किती बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यात तुम्हाला किती यश आलं, सॉ मीलवर दंड किती लावला? यासह अन्य प्रश्न विचारले गेले मात्र गर्कळ यांना यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यांना सावरत जिल्हाधिकारी म्हणाले, पुढच्या प्रेसमध्ये याची माहिती मी तुम्हाला देईल. यावर बीडच्या वृक्षतोडीला जबाबदार कोण? हे स्पष्ट झाले.








