मध्यरात्री वारकर्यांचा रस्त्यावर ठिय्या
वाहतूक ठप्प, पोलिसांची धावपळ, रात्री बारानंतर पंढरपूरसाठी चार गाड्या सोडल्या
बीड (रिपोर्टर): एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणार्या वारकर्यांना रात्री बीड बसस्थानकातून एकही एसटी बस सोडली जात नसल्याने संतापलेल्या वारकर्यांनी मध्यरात्री बारा वाजता बसस्थानकावरील रोडवर ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. अचानक वारकरी रस्त्यावर येऊन बसल्याने काही काळ पोलिसांची धावपळ उडाली. शेवटी रात्री बारानंतर चार बस पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या. मात्र तत्पूर्वी बसस्थानकातील अधिकारी कर्मचार्यांनी वारकर्यांची टिंगलटवाळी केल्याचा आरोप उपस्थित प्रवाश्यांनी केला.
आज एकादशी असल्याने काल जिल्ह्यासह जिल्हाबाहेरून वारकरी हे पंढरपूरला जाण्यासाठी बीड बसस्थानकात आले. मात्र रात्री आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत बीड बसस्थानकातून एकही बस पंढरपूरसाठी सोडण्यात आली नाही. परिणामी बीड बसस्थानकात वारकर्यांची संख्या शेकड्यावर जावून पोहचली. वेळोवेळी बसची मागणी करूनही बसस्थानकातील अधिकारी-कर्मचारी बस सोडत नसल्याचे पाहून संतापलेल्या वारकर्यांनी रात्री बारा वाजता बसस्थानकासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. उपस्थित वारकर्यांनी आमची उद्या महापुजा आहे, पंगत आहे, आम्ही वेळेत पोहोचलो नाही तर आमची वारी पुर्ण होणार नाही. आणि येथे बसस्थानकातील अधिकारी-कर्मचारी आमची टवाळी करतात, असं म्हणत मध्यरात्री आंदोलन सुरू केले. यामध्ये महिला वारकर्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. अचानक मुख्य रस्त्यावर आंदोलन सुरू झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली, पोलिसांची धावपळ उडाली. वारकर्यांचा आक्रमक पवित्रा पाहता रात्री बारानंतर परिवहन विभागाने चार ते पाच गाड्या पंढरपूरसाठी रवाना केल्या.








