गेल्या आठवडाभराच्या कालखंडात महाराष्ट्रात दोन विषयांनी काहूर उडवून सोडलं. ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटावर हिंदूवाद्यांनी आक्षेप घेतला तर दुसरीकडे मुंबई महानगरीमध्ये कबुतरांना धर्माच्या पिंजर्यात अडकवून टाकण्यात आले. तसे हे दोन्ही विषय प्रासंगिक वेगवेगळे पहायला मिळतील मात्र या विषयाचं मूळ ते एकच. जिथं धर्माला तिथं अभिमान आला आणि जिथे अभिमान आला, तिथं त्या अभिमानातून स्वार्थ पहायला मिळाला. हे दोन्ही विषय सध्या महाराष्ट्रामध्ये चघळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यातून सत्ताधारी धार्मिक भावनांचा किती आदर करतात हे दाखवण्याच्या प्रयासात थेट कबुतरांच्या बाबतीत संविधानालाही बाजुला सारलं जातय. या दोन विषयातून महाराष्ट्राचं अर्थार्जन वाढणार आहे का? महाराष्ट्राचे जटील प्रश्न सुटणार आहेत का? शेतकर्यांच्या आत्महत्या कमी होणार आहेत का? शैक्षणिक धोरण बदललं जाणार आहे का? दुष्काळावर मात करता येणार आहे का? तर नाही. परंतु या विषयाने सत्ताधार्यांंना धर्माच्या आडून नाकर्तेपणा झाकता येईल आणि विरोधकांना धर्माच्या आडून सरकारला धारेवर धरता येईल. एकूणच काय तर सत्ताधारी असोत अथवा विरोधक धर्माच्या नावावर मतांचा गठ्ठा जमा करण्यासाठी या विषयांना हाताळले जाते.
‘खालीद का शिवाजी’
या चित्रपटाच्या अडीच मिनिटांच्या ट्रेलरवरून हिंदूवाद्यांनी आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं आहे, एकतर महाराजांना एकेरी शब्दात उच्चारले, दुसरा आक्षेप असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते का? ट्रेलरमध्ये 33 टक्के मुस्लिम असल्याचा दावा केला जातो, तो दावा कुठून आणला? तिसरा आक्षेप आहे गडकिल्ल्यावर महाराजांनी मस्जिद बांधली का? ट्रेलर बाहेर पडल्यानंतर हे सगळे विषय झाले, परंतु तत्पूर्वी सेन्सर बोर्डाने या चित्रपटाला मान्यताच नव्हेतर पुढे हा चित्रपट फिफा अवॉर्डस्साठी निवडला गेला होता. मग त्यावेळी सत्ताधार्यांच्या ताब्यात असलेल्या सेन्सर बोर्डाने याकडे लक्ष दिलं नाही का? की केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम हे जवळ येतायत, महाराष्ट्र आणि देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत जातोय, ही द्वेषभावना तर कडवट हिंदूवाद्यांच्या मनी नाही, असे एक ना अनेक सवाल एवढ्यासाठीच उपस्थित होतात की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात मुस्लिम होते का?
महाराजांच्या सैन्यात मुस्लिम
नव्हते म्हणणे, हे अत्यंत चुकीचे ठरेल. सर्वप्रथम तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे नक्कीच प्रेरणादायी आहे. परंतु हे हिंदवी स्वराज्य म्हणजे सिंधू नदीवरच्या काठावरचा प्रदेश. हिंदवी म्हणजे हिंदू नव्हे तर सिंधू असे अनेक अभ्यासकांचे सांगणे आहे. स्वराज्य कुठल्या नावाने ओळखलं जातय याबाबत आम्ही गंभीर नव्हे परंतु छत्रपतींनी पारतंत्र्याच्या साखळदंडात अडकलेल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या रयतेला स्वातंत्र्याचा श्वास दिला ते साखळदंड छत्रपतींनी त्यांच्या तलवारीने तोडून टाकले. इथल्या आया-बहिणींची इज्जत त्यांनी राखली हे आमच्यासाठी महत्वाचे. मग अशा वेळी स्वराज्याचा लढा लढताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते याचे अनेक दाखले इतिहासात आहेत. होय, परंतु 33 टक्के सैनिक होते का? हे सांगणे कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मस्जिद होती का? किंवा रायगडावर मस्जिद आहे का? हे प्रश्न वादाचे म्हणण्यापेक्षा शोधाचे आहेत. कारण तिथं जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराची रचना चारमिनार काढून करण्यात आलेली आहे. खरं पाहिलं तर इतिहासातून आपण काही घ्यायला हवं, परंतु महाराजांचा इतिहास धर्मासाठी आणि जातीसाठी वापरला जातो हेच मोठं दुर्दैव. छत्रपतींच्या स्वराज्यात मुसलमान किती होते, मुसलमान होते की नव्हते, ते हिंदूंचे राजा होते, हे विषय समोर आले की अधिक तीव्रतेने चर्चा केली जाते. परंतु महाराजांच्या काळात बांधलेला एखाद्या नदीवरचा पूल अजून पडला नाही, महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर पाण्यासाठी उभारण्यात आलेले तलाव अजूनही आहेत. ती पाणी व्यवस्थापन यावर चर्चा करत नाहीत, छत्रपतींच्या कार्यकाळामध्ये कायदा मोडणार्यांना कठोर शिक्षा केली जात होती, त्यावर भाष्य नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये मात्र उभे करून काही तथाकथीत धर्मांध अशा गोष्टींना हवा देतात. महाराष्ट्रात इतिहास आणि महापुरुष हे धर्मात वाटणे आधीपासून सुरू होते. आता पशू-पक्ष्यांनाही धर्मात वाटलं जातय. म्हणूनच
‘कबुतराचा धर्म’
मुंबईत शोधला जात नाही तर तो सांगितला जातोय. कबुतरखान्यामुळे मुंबईच्या काही भागात कबुतरांच्या विष्टेतून आजार पसरतात आणि त्या आजारातून लहान मुलांसह वृद्धांना मरणयातना होतायत, म्हणून कबुतरखाने बंद केले पाहिजेत, अशी काहीशी भूमिका घेतली गेली ती न्यायालयामध्ये मांडण्यात आली. न्यायालयाने कबुतरखाने उठवण्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना धान्य न टाकण्याचा आदेश देण्यात आला. मात्र भारतीय संविधान असो अथवा न्यायालय याचा आदर न करता जैन धर्मीयांनी कबुतरांना खाऊ घालणे हा आमचा धर्म आहे, असे सांगत न्यायालयाचे आदेश धुडकावण्याचा प्रयत्न केला. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री त्या ठिकाणावर गेल्यानंतरही उग्र आणि तीव्र स्वरुपाचे आंदोलन जैन समाजाकडून करण्यात आले. हेच आंदोलन विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी केलं असतं, शेतकर्यांनी त्यांच्या मागणीसाठी केलं असतं, देशातल्या अन्य लोकांनी आपल्या न्याय-हक्कासाठी केला असता तर तिथे लाठीचार्ज झाला असता, आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असते मात्र इथे सरकराने चाकू-सुरी घेऊन आलेल्या आंदोलकांवरही साधे गुन्हे दाखल केले नाहीत. एकीकडे भर रस्त्यावर कबुतरांना अन्न-धान्य टाकायचं आणि दुसरीकडे स्वत:च्या घराला, जैन मंदिराला जाळ्याने झाकून टाकायचे, कबुतरांबाबतचं हे दुटप्पी प्रेम कबुतरांचा धर्म सांगून तेढ निर्माण करणारे होते का? हा प्रश्न उपस्थित होतो.
जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातक ॥
संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे, एणे वागयज्ञ तो शावे तो शुनी मज द्यावे ॥ पसायदान
दुसरीतांचे तिमीरी जावो । विश्वस्व धर्म सुर्य पहावं ।
जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातक ॥
असे म्हटले. ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे, या भुतलावर असलेल्या जीव-जंतुंना जे जे वांछिल ते ते त्यांना मिळायला हवं आणि ते मिळतयही. कबुतर हे शांततेचे प्रतिक आहे, प्रेमाचं प्रतिक आहे, त्याला एखाद्या धर्मात गुंफणं म्हणजे आपल्या मुर्खपणाचा सर्वात मोठा अजेंडा आणि तोच अजेंडा गेल्या आठवड्यात पहावयास मिळाला. खुल्या अस्मानात फिरणारा स्वत:चं अन्न स्वत: निर्माण करणारा एखादा पक्षी सोन्याच्या पिंजर्यात जरी बंदिस्त केला आणि त्याला खाऊ-पिऊ घातला तर तो पारतंत्र्यात असतो. इथे तर कबुतरांनाच धर्माच्या पिंजर्यात बंद करण्याचा प्रयास होतोय. दुर्दैव एवढच छत्रपतींच्या इतिहासातून भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा घ्यायला हवी आणि संत ज्ञानेश्वर म्हणतात त्या पद्धतीने ज्याने त्याने जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजातक म्हणत श्रध्दा-सबुरीने जातीय, धार्मिक द्वेष नव्हे तर प्रेम वाढवायला हवं.








