
नागरिकांनी घ्यावी काळजी : प्रशासनाचे आवाहन
बीड, (रिपोर्टर)ः-महाराष्ट्रात पावसाळ्यातील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभाग तसेच बीड जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे . वेळोवेळी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशार्यांच्या पार्श्वभूमीवर , जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले असून , नागरिकांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी , असे आवाहन प्रशासनाने केले आहे .
पूरप्रवण भागातील नागरिकांनी प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करावे . नदी , नाले , धरण , तलाव या ठिकाणी जाणे टाळावे . सुरक्षित स्थळी हलण्यास प्रशासनाने सांगितल्यास त्वरित पाऊल उचला , असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आवाहन केले आहे.अधिकृत सूचनांचे पालन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका. महत्त्वाची कागदपत्रे, औषधे, अन्नसाठा आणि पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवा, असे अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी नमूद केले . तर अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांनी इशारा देताना पूराच्या पाण्यातून पायी किंवा वाहनाने जाणे जीवघेणे ठरू शकते . मोबाईल चार्ज ठेवावा , सुरक्षित पाणीच वापरावे , असे सांगितले .
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी आवाहन करताना पूरस्थिती किंवा आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा . प्रशासन पूर्णपणे सज्ज असून त्वरित मदत पुरवली जाईल , असे प्रशांत वाघमारे यांनी सांगितले . त्यांचा संपर्क क्रमांक =न्न 95 61 49 94 49 असून याशिवाय यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक –
1077,1000, 992 असून अधिकृत माहिती यावर मिळेल . यनिमित्ताने हवामान विभागाच्या इशार्यांकडे गांभीर्याने लक्ष द्या . नदी , नाले , तलाव यांच्या पातळीतील बदलावर लक्ष ठेवा . पूराच्या वेळी लहान मुले , वृद्ध , महिलांची विशेष काळजी घ्या , असे शेळके यांनी आवाहन केले . तसेच खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली .महाराष्ट्र व भारतातील पूरस्थिती : महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ व मराठवाड्यातील घाटमाथा परिसर हे पूरप्रवण मानले जातात . सावित्री , वशिष्ठी , शास्त्री , कृष्णा , पंचगंगा , वारणा , वैनगंगा , पेंच , वर्धा या नद्यांना पावसाळ्यात पूर येतो . तथापि अलीकडील काळात बदलत्या हवामान परिस्थितीत कोणत्याही नदी नाले पुढे यांना अचानक पूर येऊ शकतो त्यामुळे कोणीही गाफील राहता कामा नये .
भारतात आसाम , बिहार , उत्तर प्रदेश , केरळ , ओडिशा या राज्यांत दरवर्षी गंभीर पूरस्थिती निर्माण होते . ब्रह्मपुत्रा , गंगा , महानदी , पेरियार नद्यांच्या काठावरील गावे मोठ्या प्रमाणावर बाधित होतातपूरकाळात घ्यावयाच्या खबरदारी कशी घ्यावी याबद्दल माहिती देताना श्री शेळके म्हटले की हवामान व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा . पाण्याची पातळी वाढल्यास उंच ठिकाणी स्थलांतर करावे . विजेच्या तारा, खांब, उपकरणांपासून दूर राहावे . दूषित पाणी पिणे टाळा ; उकळलेले पाणीच वापरा .पूराच्या पाण्यात जाणे टाळा . प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा . बचाव पथकाच्या सूचनांप्रमाणे वागा .पूर ओसरल्यानंतर घरात परतताना स्वच्छता व निर्जंतुकीकरण आवश्यक आहे . दूषित पाणी व सडलेले अन्न टाळा , असे उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची सूचना आहे.राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( एस डी एम ए ) हे महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख प्राधिकरण असून , आपत्तीपूर्व तयारी , बचावकार्य , पुनर्वसन आणि पुनर्निर्माण या सर्व टप्प्यांवर नियोजन व अंमलबजावणी करते . नैसर्गिक आपत्तींसोबतच मानवनिर्मित आपत्तींच्या व्यवस्थापनासाठीही ही संस्था कार्य करते .






