बॅक डेट अन् बनावट सह्याच्या आधारे अनेकांच्या नियुक्त्या
एसआयटी चौकशीचा ससेमेरा, भ्रष्टाचार करणार्यांचे धाबे दणाणले
पुढील आठवड्यात एसआयटी बीडमध्ये ?
बीड, (रिपोर्टर)ः- राज्यभरात गाजत असलेला बनावट शिक्षक भरती प्रक्रियेचे लोन बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर असल्याचे उघड झालेले आहे. तब्बल 800 शिक्षक हे बॅक डेटेड आणि काही शिक्षणाधिकार्यांच्या बनावट सहीने भरती केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिक्षण विभागाच्या संगनमताने शालार्थ आयडीद्वारे कोट्यावधी रूपयांच्या पगारा उचलल्याचे सांगण्यात येते. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयई नेमण्यात आलेली आहे. ती येत्या आठवड्यात जिल्ह्यात डेरेदाखल होणार आहे. त्यामुळे पैसे देवून भरती झालेले शिक्षक, संस्था चालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामध्ये मागील तारखेमध्ये अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या दिल्या. या नियुक्त्यामध्ये तत्कालीन कालावधीमध्ये जे शिक्षणाधिकारी कार्यरत होते. त्यातील काही शिक्षणाधिकार्यांना आणि शिक्षण विभागातील कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक रकमा देवून या नियुक्त्या केल्या. तर चक्क काही संस्था चालकांनी दलालांच्या मार्फत त्या कालावधीतील संबंधित शिक्षणाधिकार्यांच्या आणि कर्मचार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून या नियुक्त्या दिल्या आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक यामध्ये जवळपास 778 शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या सोबतच काही शिक्षकेत्तर कर्मचार्यांचाही नियुक्त्या दिलेल्या आहेत.
सुरूवातीला ज्यांना मागच्या तारखेत आणि बनावट स्वाक्षरीने नियुक्त्या दिल्या. त्यातील सुरूवातीला विनाअनुदान तत्वावर या नियुक्त्या दाखवून पुन्हा त्यांना अनुदानाच्या पदावर घेण्यात आले. अनुदानाच्या पदावर घेतल्यानंतर शिक्षण विभागाच्या संगणमताने यांना उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून मान्यता घेण्यात आली आणि तदनंतर संभाजी नगर येथील शिक्षण उपसंचालक आणि बीड येथील प्राथमिक माध्यमिक शिक्षणविभागातील अधिकार्यांच्या संगणमताने शालार्थ आयडी उघडून कोट्यावधी रूपयांचे फरक बिले काढण्यात आली. या कोट्यावधी रूपयांच्या फरक बिलातून अर्धे संस्थाचालक आणि अर्धे शिक्षण विभागातील अधिकारी असा बीड जिल्ह्यात हजारो कोटींचा घोटाळा झालेला आहे. यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपासणी चौकशी नियुक्त केली असून ही चौकशी समिती पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस महानिरिक्षक मनोजा शर्मा आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाचे सह संचालक हारून आतार यांच्या नेतृत्वात ही विशेष चौकशी समिती येत्या आठवड्यात बीड येथे दाखल होत असून यात ज्यांनी ज्यांनी आपले हात ओले केले. त्यातील संस्था चालक, शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी आणि ज्यांनी लाखो रूपयांची देणगी देवून मागच्या तारखेत शिक्षकांची नोकरी मिळवली अशा सर्वांचे धाबे दणाणले आहेत.





