
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश
जिल्ह्यातील 7 तलाव शंभर टक्के भरले
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवस धो धो पाऊस पडला. या पावसामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आले. केज तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने तेथील आठ गावातील 600 हेक्टरमधील पिके पुर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणीही पिकांचे नुकसान झाले. ज्या शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाच्या वतीने देण्यात आले. या पावसाने जिल्ह्यातील तलाव शंभर टक्के भरले आहेत.
राज्यभरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यमस्वरुपाचा पाऊस पडला. केज, अंबाजोगाई, माजलगाव आणि बीड या परिसरामध्ये धो धो पाऊस पडला. या पावसाने केज तालुक्यातील हनुमंतपिंप्री, चिंचोलीमाळी, राजेगाव, दैठणा, बोरगाव, भोपला, हादगाव, डोका, लाखा, मांगवडगाव या 8 गावांतील पिके उद्ध्वस्त झाली. या आठ गावांतील 600 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असून दोन घरांची पडझड देखील झालेली आहे. जिल्ह्यातल्या इतर ठिकाणची पिकेही बाधीत झाली असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. या पावसामध्ये बिंदुसरा, सिंधफणा, महासांगवी, कडा, कुंडलिका, उर्ध्व कुंडलिका, मांजरा हे सात धरणे शंभर टक्के भरले आहेत.





