
दुपार नंतर सगळेच ‘गायब’
बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा कर्मचारी गैरहजेरीचा मुद्दा चर्चेत आला आहे.दुपारच्या शिफ्टमध्ये नर्सेस,तंत्रज्ञ तसेच काही डॉक्टर व कार्यालयीन कर्मचारी वेळेवर न आल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. रुग्णांना सकाळपासून उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत असून, वेळेवर डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवेत मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यांकडे जावे लागत असून, गरिब जनतेवर आर्थिक भार पडत आहे. कार्यालयीन कर्मचारी सकाळी थोड्याच वेळेसाठी कार्यालयात हजर असल्याचे पाहायला मिळाले.कार्यालयीन वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 6 ची असून दुपारी एक वाजल्यानंतर कोणताच कर्मचारी जागेवर आढळून येत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जिल्हा रुग्णालयातील हा भोंगळ कारभार कधी पर्यंत चालू राहणार? असा प्रश्न बीड जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित केला असून, यात काही सुधारणा होईल का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.









