
साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे
चार महिन्यात पाच जणांचा मृत्यू
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये मे ते ऑगस्ट महिन्याच्या 20 तारखेपर्यंत कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, बाजरी आदी पिकांचे जवळपास 4 हजार 732 हेकटर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे चालू महिन्यात झाले असून जिवितहानीमध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. आज सकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील ढालेगाव याठिकाणी एका 82 वर्षीय इस्माचा मृत्यू झाला आहे तर 11 जनावरे ही विज पडून दगावलेली आहेत.
बीड जिल्ह्यात चालू आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामध्ये सर्वाधिक मुग पिकाचे नुकसान झाले असून काढणीला आलेला मुगाला कोंबे फुटली आहेत. सोयाबीन कापूस आणि बाजरी या पिकाचेही पाण्याखाली क्षेत्र गेले आहे तर काही ठिकाणी पिकांसह शेतजमीन खरडून गेलेली आहे. महसूल विभागाकडून तलाठ्या मार्फत नुकसान झालेल्या शेत पिकांचे पंचनामे सुरू आहेत. आजपर्यंत झालेल्या पिकांच्या नुकसानीचा हेक्टरमधील आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जे पिकांचे नुकसान होत आहे.
त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्यानुसार कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आणि महसूल विभागातील तलाठी या दोन्ही विभागाच्या वतीने संयुक्त रित्या हे पंचनामे करण्यात येत आहेत. जून महिन्यात माजलगाव तालुक्यातील शुक्लतिर्थ लिमगाव येथील अशोक शेरकर या शेतकर्यांचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर वाहत्या पाण्यात वाहून जावून एक जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर दोघेजण तलावात बुडून मृत्यू पावलेले आहेत. आज पहाटेच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथील 82 वर्षीय खजीरभाई पठाण या इस्माचा मृत्यू झालेला आहे. शेतकर्यांची जनावरे ही या अतिवृष्टीमध्ये दगावलेली असून 11 जनावरे ही वीज पडून दगावलेली आहेत. पंचनामा झाल्यानंतर एकूण जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीचा आकडा समोर येवू शकेल. राज्य सरकारकडून जीराईत पिकांसाठी 8 हजार 500 एवढी मदत हेक्टरी दिली जाते तर बागायतसाठी 17 हजार आणि फळबाग पिकांसाठी 22 हजार एवढी मदत राज्य सरकार करते.
————-








