
न्यायाधीश, स्टेनोग्राफर सक्तीच्या रजेवर
बीड (रिपोर्टर): वडवणी न्यायालयात कार्यरत असणारे सहाय्यक सरकारी वकील अॅड. व्ही.एल. चंदेल यांनी काल न्यायालयाच्या इमारतीमध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपविले होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ स्तर न्यायाधीश आणि त्यांच्या स्टेनोला सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वीच या ठिकाणी अॅड. व्ही.व्ही. चंदेल हे सरकारी वकील म्हणून रुजू झाले होते. सरकार पक्षाच्या वतीने अनेक प्रकरणांमध्ये बाजू मांडताना संबंधित न्यायाधीशाकडून त्यांना अपमानीत व्हावे लागत असल्याच्या ऐकण्यात येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अॅड. चंदेल यांनी सुसाईड नोट आपल्या खिाामध्ये लिहून ठेवली होती. मात्र हे न्यायालयीन संवेदनशील प्रकरण असल्याने याठिकाणी भेट दिलेल्या अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती तिडके यांनी या चिठ्ठीमध्ये काय आहे हे मात्र सांगितलेले नाही. त्यासोबतच जिल्ह्याच्या सहाय्यक सरकारी संचालक श्रीमती मनिषा गंडले यांनीही वडवणी न्यायालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.





